कृतज्ञता सोहळा!!

हे नश्वर शरीर सोडून जाताना “जीवनदान देणारे” आणि  त्यातून “नवजीवन मिळणारे” असा अनोखा कृतज्ञता सोहळा पुण्यात ZTCC च्या माध्यमातून रुबी हॉस्पिटल इथे भरतो.
हा असा अविस्मरणीय सोहळा आम्ही 2 वर्षांपूर्वी अनुभवला आणि अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले !

एक काकू.. साधारणतः पन्नाशीच्या असतील..त्यांचा 22 वर्षाचा मुलगा accident मध्ये ब्रेन-डेड झालेला,  पायाखालची जमीन सरकावी असा आघात, एकुलता एक मुलगा, ऐन उमेदीत असा एकाएकी सोडून गेलेला.. केवढा आक्रोश, आकांत, नातेवाईकांचे बरे- वाईट बोल.
डॉक्टरांची त्याचे प्राण वाचविण्यासाठी शर्थ…पण शेवटी आयुष्याची दोरी इथवरच होती.. “Patient Brain dead आहे” असा डॉक्टरांचा निर्वाळा..
त्या माऊलीच्या समोर फक्त आणि फक्त अंधार.
शिक्षण जेमतेम चौथी..

हॉस्पिटलमधील समन्वयक या माऊलीशी बोलत होत्या..अवयवदानाविषयी शांतपणे सांगत होत्या ..” तुमचा मुलगा मेंदू-मृत आहे. पण कृत्रिम श्वासावर असल्याने त्याचे अवयव तुम्ही परवानगी दिलीत तर आपण दान करू शकतो . जाताना तुमचा मुलगा  सात वेगवेगळ्या रुग्णांना जीवनदान देऊन जाईल.”

नातेवाईक, आप्तमंडळींचा विरोध, अनेक प्रश्न, नाना शंका !!  किती दडपण असेल त्या माऊलीच्या मनात.. जग काय म्हणेल, आपला निर्णय योग्य आहे ना ? मनाची चलबीचल.. एक क्षण डोळे मिटून शांत विचार केला अन त्या माऊलीने अशिक्षीत असूनही खूप महत्त्वाचा  निर्णय घेतला..

मुलगा गेला याचं दुःखं कधीच भरून न येणारं.. पण जाता जाता त्याच्या आयुष्याचं सोनं होईल.. मला  मान्य आहे डॉक्टर.. मी अंगठा देते तुमच्या फॉर्म वर. .”

त्या बाई हा प्रसंग स्वतः सांगत होत्या …मुलगा गेल्याची जखम कधीच भरून न येणारी …पण माझ्या मुलाने जाता-जाता 7 जणांना जीवनदान दिलं आणि त्यारूपाने त्याच्या शरीराचं सोनं झालं … याचं मोठ्ठं समाधान !!

खरच सलाम त्या माऊलीला. मारणानंतरही खऱ्या अर्थाने तीने मुलाला जगवीले ..

एक 22 वर्षांची मुलगी ..नुकतंच heart-transplant झालेलं …गेले 13 वर्षे हृदयाच्या असाध्य आजाराने अगदी असह्य जीवन जगत होती … खेळ नाही, चालायला त्रास होत असे..वडील उचलून घेऊन शाळेत सोडायचे, नेटाने शिक्षण चालू ठेवले ..पण गेल्या वर्षी सर्व मेडिकल treatment नी हार मानली .. heart transplant हा एकच पर्याय उरला ..खूप प्रतीक्षा करून  एका brain dead व्यक्तीचे हृदय उपलब्ध झाले आणि आयुष्याला नवजीवन मिळाले …विझू पाहणारी ज्योत पुन्हा तेजाने उजळून निघाली ..आज त्या अनाम दात्याचे आभार मानायला, कृतज्ञता व्यक्त करायला ती स्वतःच्या पायांनी चालत आली होती.. आता ती चालू शकत होती, हृदयाची लय शांत-संयत होती..जगण्याची आस आणि नवी स्वप्न तिच्या डोळ्यात दिसत होती . . आणि चेहऱ्यावर त्या अनाम अवयव दात्याप्रति अपार कृतज्ञता !!  आयुष्याचं हे मिळालेलं दान . त्याचं आता सोनं करायचं हीच एक उर्मी, ईच्छा आणि निश्चय !!

एक आई आणि दोन मुले ..16 आणि 18 वर्षे कोवळे वय..आई खूप धीराने सांगत होती.. या मुलांच्या वडिलांचा accident झाला गेल्या वर्षी.. ब्रेन- डेड झाले ..समन्वयक अवयवदानाविषयी सांगत होत्या ..मी सुन्न होते ..पण माझ्या मुलांनी सगळे नीट समजावून घेतले आणि ” आपले बाबा कुठल्या ना कुठल्या रूपाने जीवंत राहणार आहेत आई..गरजू आजारी व्यक्तीचं जगणं आपल्या बाबांच्या अवयवदानामुळे सुसह्य होऊ शकतं..तू दे consent ” असे सुचविले..  मुलांच्या बोलण्याने धीर आला, जग काय म्हणेल याचा विचार क्षणभर मनात आला, पण तो दुसऱ्याच क्षणी झटकून टाकला आणि conest sign केली.

आज आम्ही या मुलांच्या बाबांच्या फोटोला हार घालीत नाही .. आम्हाला माहीत आहे ..दान केलेल्या अवयव रूपाने ते कुठेतरी जीवंत आहेत ..

खरंच हा निर्णय किती योग्य घेतला आपण . आपल्या जवळच्या व्यक्तीची जगण्याची दोरी आपल्या हातात नाही, मरण आपण थांबवू शकत नाही, पण समन्वयक आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार घेतलेल्या अवयवदानाच्या त्या एका निर्णयाचे आज खूप समाधान आहे, अभिमान आहे !!

प्रत्येक अनुभव ऐकताना अंगावर रोमांच उभे रहात होते..
अविस्मरणीय क्षण …
जाता जाता “जीवनदान” देऊन गेलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि “जीवनदान” पदरात पडलेल्या या कृतार्थ-कृतज्ञ व्यक्तींच्या डोळ्यातील भाव सर्व काही सांगून गेले ..

मनोमन निश्चय झाला …अवयव दान सर्वश्रेष्ठ दान …देण्याचं भाग्य सर्वांच्या भाळी असेलच असं नाही …पण माझ्या भाळी हे असेल तर माझं नक्की नक्की अवयवदान होईल !!

– अस्मिता ताटके

X