तू, जी जमाने के लिये ….
पर्श्या तसा…असा तसाच..दाढी वाढलेली..केस कधीतरीच जागेवर..उंचीला बेताचा..शरीर यष्टी किरकोळ..वर्ण गव्हाळ. पण जीभ मात्र सरस्वती नांदणारी. गालीब, कैफी आझमी, गुलजार, भाऊसाहेब पाटणकर, याचे वर्गमित्र असल्यासारखे बोलणारा. सारे शेर, गझल अगदी ओठावर..प्रेम, विरह..हा तर याचा हातखंडा.
भुरभुर करणारे केस हा त्याचा विक पॉइंट. ललना, रमनी, युवती, तरुणी…यांच्या केस सांभारात virtual गुंतून रहाणारा. .. ओ तुम्हारी झुल्फे. दास्ताने मोहब्बत ..असे काही तरी उर्दू हिंदी मिश्रित बोलणारा हा पर्श्या. यातील निम्म्या शब्दांचे त्याला अर्थ ही माहित नसतं.. पण तो बोलत असायचा..तोंडावर अशी शेरो शायरी फेकत असायचा, की गमएदिल, रुखसत, असे शब्द त्याच्या जीभेवर साक्षात हुतूतू खेळायचे, ती प्रधानांची आरती म्हणजे अगदी अप्सरा…अगदी १०० percent दिक्षीतांची माधुरी(उर्फ सध्याची सौ. नेने ).
पाटलांची शर्मिला…अहाहा साक्षात उर्वशी… मार्तोंडकरांची उर्मिला.. पर्श्याचे अजून एक विशेष …तो जी मुलगी त्याला आवडत असे तिला तो एकतर रंभा, उर्वशी , अप्सरा म्हणायचा नाहीतर माधुरी, उर्मिला, ऐश्वर्या असे काहीसे म्हणायचा… असे बोलत असताना त्याच्या डोळयात एक विलक्षण चमक दिसायची. गालावर लज्जा कम हास्य असायचे..एकदम १०० टक्के आशिक.
आम्हा साऱ्या मित्रांना त्याची ही आशिकी माहीत होती… इक दिल के टुकडे हजार हूए, कोई यहाँ गिरा, कोई वहा.. नंतर पुढे कधीतरी हिच कन्या आपल्या ‘ अहो ‘ सोबत जाताना दिसली की.. पर्श्या थोडा उदास व्हायचा… पण लगेच म्हणायचा..’ ठीक है चलता हैं, ‘ ….आणि लगेच समोर कोणीतरी ‘अपनी झुल्फे लहराती’ हुई जायची….(ही त्याचीच भाषा . त्याच्या मते उर्दू मध्येच प्रेम व्यक्त करता येते..) आणि हा परत एका नव्या आशिकाच्या रुपात जायचा… ओ हसीना झुल्फोवाली… म्हणायचा.. पर्श्याची हिंदी गाणी तोंडपाठ.. अगदी श्रीवल्ली सुद्धा..
आम्ही त्याची चेष्टा करायचो..मस्करी करायचो..त्याला कळायचे.. मग बेटा म्हणायचा… ‘ चांद को क्या मालुम चाहता है उसे कोई चकोर ‘
आपले हृदय बऱ्याच जणींना देण्यासाठी अथक प्रयत्न करणारा पर्श्या…तसा स्वभावाने फार निर्मळ. पाप, वाईट विचार, त्याच्या मनाला कधीच शिवले न्हाईत.त्याच्या आईला पण कळायचे कधी कधी हे सारं..ती बिचारी आपल्याला सून बघायला मिळेल या आशेवर………..
आणि आज सकाळीच माझ्या मोबाईलवर WhatsApp मेसेज ची ट्यून वाजली. व्हॉट्सॲप वर एका मित्राचा मेसेज आलेला …. पर्श्याचा अपघात झाला आहे.. हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये आहे. डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड म्हणून घोषित केलेय… हॉस्पिटल मध्ये counseller मॅडम सांगत आहेत.. तुमच्या मुलाचे अवयव दान केले तर ६-७ लोकांना चांगले जीवन जगता येणार आहे.आणि त्याची आई मोठ्या मनाने आपल्या या मुलाचे हे निर्मळ हृदय आणि बाकीचे अवयव कोणाला तरी दान देण्यासाठी consent फॉर्म वर सही करत आहे…
धक्का बसला होता पर्श्याच्या जाण्याने.. पण त्याच वेळी अभिमानास्पद वाटत होते त्याच्या आईच्या निर्णयामूळे.
खुद के लिये जिये तो क्या जिये, ये दिल ,तू जी जमाने के लिये
आयुष्य भर आपले हृदय कोणाला तरी देण्यासाठी आतूर असलेला हा वेडा … मृत्यूनंतर मात्र आता कोणाला तरी आपले हृदय देत होता..
नशीब ..दैव यालाच म्हणत असावेत.. नाही?
– विवेक ताटके