धर्म आणि अवयव दान
श्वास आहे तो प्रवास आहे,सहवास आहे.. नाहीतर निर्वात असा हा निवास आहे
मी ‘मी’ म्हणून आहे तोवरी देहावर केले प्रेम, केली भक्ती , मग मी ‘मी’च नसेन तेव्हा कसली आसक्ती.,ही तर मुक्ती.
मग हे ठाऊक असताना, हा देह जर मला इतरांसाठी देता आला…त्याचे अवयव दान करता आले तर किती पुण्याचे काम…सत्याचे काम…म्हणजे धर्माचे काम. असे करता करता ‘ धर्म ‘ या संकल्पनेवर मग विचार करू लागलो…नी शोधता शोधता समोर आले काही आध्यात्मिक संदर्भ.
समोर आले गणपती बाप्पाचे उदाहरण.. अरे, आपला विघ्नहर्ता एक अवयव प्रत्यारोपण झालेले प्रथम उदाहरण. हत्तीचे शीर बसवलेला. त्याचा आशीर्वाद आपल्याला असतोच. स्वतः एक अवयव दान स्वीकारणारा तो प्रथमेश ठरला
दुसरे उदाहरण समोर आले दधिची ऋषींचे.. आपल्या हाडापासून वज्रास्त्र करून देवांच्या राजाला म्हणजे इंद्रदेवाला राक्षसाविरुद्ध लढून त्यांचा पराभव करण्यासाठी मदत केली होती. चांगल्या गोष्टी साठी देह देऊन वाईट आसूरी वृत्तीचा नाश केला होता
तिसरे उदाहरण आले.. विष्णू देवाने शंकर भगवान यांना आपला डोळा दान दिल्याची कहाणी असलेले तामिळनाडू मध्ये थिरुविझिमिझलाई येथे असलेले एक शिव मंदिर .भगवान विष्णू यांना भगवान शंकराकडून सुदर्शन चक्र हवे होते दानवांचा नाश करण्यासाठी. म्हणून भगवान विष्णू भगवान शंकराला रोज एक हजार कमळ पुष्प वाहून पूजा करत ते हे ठिकाण . एके दिवशी पूजे साठी कमळाचे एक फुल कमी पडले.. त्यावेळी भगवान विष्णू ने आपला एक डोळा काढून शंकराला दिला.. हे एक नेत्रदाना चे प्रतीक मानण्यात येते. (संस्कृत मध्ये कमल नयन असा शब्द पण आहे) हा नेत्र म्हणजे शंकराचा तिसरा डोळा.
अजून एक उदाहरण आहे आंध्र प्रदेशात असलेल्या मंदिराचा.थिम्मन नावाचा भगवान शंकराचा भक्त. भगवान शंकराच्या एका डोळ्यातून रक्त येऊ लागले. बरेच प्रयत्न करून रक्त येण्याचे थांबेना, मग थिम्मन ने आपला एक डोळा बाणाने काढून शंकर भगवान यांच्या डोळ्याचे जागी लावला… आणि रक्त थांबले. त्याचवेळी दुसऱ्या डोळ्यातून रक्त येत आहे हे पाहताच, थिम्मन ने आपला दुसरा डोळा काढण्यासाठी डोळ्याला बाण लावला.. आणि तोच भगवान शंकर आपल्या या भक्तावर प्रसन्न झाले..त्यांनी त्याचे दोन्ही डोळे परत नीट केले. आणि तेव्हापासून थिंमन चे नाव झाले कन्नप्पा नयनार
( तमिळ मध्ये डोळे देणारा शिव भक्त असा अर्थ होतो)
या चारही कथा मधून मला काय जाणवले
धर्म म्हणजे काय.. धर्म म्हणजे सत्य…धर्म म्हणजे चांगला आचार विचार. धर्म म्हणजे जगण्याची पद्धत. या धर्मातच अवयव दान केल्याच्या, देहाचा चांगल्या कामासाठी उपयोग केल्याचा दाखला आहे.
यावर कथांवर विश्वास असो अथवा नसो ..पण एक गोष्ट मला जाणवते ती म्हणजे..दुसऱ्या साठी आपला देह कारणी लावणे ही संकल्पना.
एक मतप्रवाह असा आहे की,मर्त्य आहे ते शरीर..देह म्हणजे पंच महाभूते.अखेर मातीत मिसळणार…राख होणार.. म्हणजे हे शरीर फक्त बदलणारे घर आहे आणि त्यातील आत्मा हा या घरांचा मालक ..जो अमर आहे.
त्याच वेळी दुसराही एक मतप्रवाह समोर येतो…आत्मा वगैरे असे काही नाही नसते.. पुनर्जन्म असे काही नसते..जीव जन्मतो आणि एके दिवशी जातो.
पण दोन्ही विचार हे जरी विरोधाभासी असले तरी या दोन्ही मतप्रवाहामध्ये एक साम्य मात्र आहे … ते म्हणजे कोणी अमर नाही…
मातीच सत्य सांगे, मातीत मिसळे माती तेल आहे तोवरी जळती दिव्यातील वाती
जगातील कोणताही धर्म असो….म्हणजे वेगवेगळे विचार असोत, एक धर्म साऱ्या धर्मात आहे तो म्हणजे मानवता धर्म.
मग का नाही, आपण तेल संपायच्या आधी ज्योतीचा आणि तेल संपल्यावर पणतीचा इतरांसाठी वापर करायचा…??. सारे मातीत रुपांतरीत होण्याआधी अवयव दान करण्याचा संकल्प तरी का नाही करायचा?
काय म्हणता………
( कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. . माझा या विषयावर अभ्यास नाही..पण जे वाचनात आले त्या वरून माझे विचार मांडण्याचा हा एक विनम्र प्रयत्न आहे)
– विवेक ताटके