वारी… भक्तीचा प्रवास आणि जीवनदानाचा संदेश|

– डॉ. मनीषा जाधव
आषाढी वारी… महाराष्ट्राच्या संस्कृतीचे स्पंदन, भक्तीचा महासागर आणि समतेचा जिवंत उत्सव. लाखो वारकरी “ज्ञानोबा-तुकाराम”चा गजर करत विठुरायाच्या भेटीस निघतात. या पवित्र प्रवाहात यंदा ReBirth Foundation तर्फे अवयवदान जनजागृतीचा संदेश घेऊन सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. या संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली, आणि ती माझ्यासाठी केवळ जबाबदारी नव्हती; ती एक आध्यात्मिक अनुभूती होती.
या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, IEC, ZTCC पुणे,ROTTO NOTTO आणि SOTTO, महाराष्ट्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समाजहिताच्या या कार्यात त्यांचा पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला.
९ जुलै रोजी पालखी पुण्यात दाखल झाली. आम्ही हातात अवयवदानाचे संदेश असलेले फलक घेऊन वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली. आमच्या स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेट दिली त्यात सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकरजी ,श्रीमंत मालोजी राजे,देहू संस्थानाचे ट्रस्टी,श्री गणेश मोरेजी अशा अनेकांचा नामोल्लेख करता येईल.
हजारो वारकरी आमच्या फलकांकडे उत्सुकतेने पाहत होते. आम्ही घातलेल्या टोप्यांवरील संदेशही त्यांच्या नजरेत भरत होते. अनेकांनी थांबून प्रश्न विचारले, माहिती घेतली आणि काही अवयवदात्यांनी स्वतःचे अनुभव आमच्याशी मनमोकळेपणाने शेअर केले. त्या क्षणी जाणवले…
“एक विचार जेव्हा मनाला स्पर्श करतो, तेव्हा तो हजारो मनांपर्यंत पोहोचण्याची ताकद मिळवतो.”

१० जुलै रोजी मार्केट यार्ड येथे मुक्कामाला असलेल्या वारकऱ्यांसाठी अवयवदानाविषयी विशेष प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. आमचे आदरणीय विवेक ताटकेजी यांनी अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी पद्धतीने अवयवदानाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर वारकऱ्यांना भोजनसेवा करण्याचा योग आला.
“वारकऱ्यांच्या ताटात वाढलेला प्रत्येक घास आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान… हीच खरी विठ्ठलाची प्रसादरूपी कृपा वाटली.”
११ जुलै रोजी पुणे ते हडपसर अवयवदान जनजागृती ची वारी आयोजित करण्यात आली. या पदयात्रेत १५० हून अधिक समाजाभिमुख नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येकाच्या हातात संदेश होता आणि प्रत्येकाच्या मनात एकच संकल्प—
“अवयवदान करा… जीवनदान द्या.”
या संपूर्ण उपक्रमात वारकऱ्यांची सात्त्विक ऊर्जा, त्यांचा निरागस विश्वास आणि विठ्ठलभक्ती सतत अनुभवायला मिळाली. हजारो लोक आमच्या फलकांवरील संदेश वाचत होते. त्यांच्या नजरेत उत्सुकता होती, संवादाची इच्छा होती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तयारीही दिसत होती.
एक डॉक्टर म्हणून अनेक जीवनसंघर्ष पाहिले आहेत. अवयवाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांतील आशा जवळून अनुभवली आहे. म्हणूनच या वारीत भक्तीबरोबर जीवनदानाचा संदेश देण्याची संधी आमच्यासाठी अत्यंत मोलाची होती.
त्या भक्तीच्या महासागरात चालताना एकच गोष्ट जाणवत होती..ज्या विठ्ठल माऊलींच्या दर्शनासाठी हे हजारो जीव आपला प्रपंच मागे टाकून चालत आहेत ती माऊली पंढरपूरातल्या गाभाऱ्यात कुठे राहते ??? खरा पांडुरंग तर इथेच आहे तुमच्यात-माझ्यात. ते सर्व अवयवदाते ज्यांनी आपले अवयव दुसऱ्यांना जीवन दान देण्यासाठी दिले त्या सर्वांविषयी अपार कृतज्ञता मनात दाटून आली.त्या प्रत्येकामध्ये मला विठ्ठल दिसू लागला.
तो कुठे राहतो मंदिरी , गाभारी
तो तर माणूस शोधतोय दारोदारी.
विठ्ठल बनण्याची संधी आहे खरी
अवयवदान करुनी जाऊ मुक्ती मार्गावरी.
संत तुकाराम महाराज म्हणतात
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा, देव तेथेंचि जाणावा॥
अवयवदान म्हणजे याच अभंगाचा आधुनिक काळातील अर्थ आहे. आपल्या जाण्यानंतरही अनेकांच्या आयुष्यात प्रकाश फुलवण्याची ही संधी आहे.
या उपक्रमात माझ्यासोबत कार्य करणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाचे, सहभागींचे, ReBirth Foundation चे आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, IEC, ZTCC पुणे व NOTTO,ROTTO ,SOTTO,
महाराष्ट्र या सर्व संस्थांचे मी मनःपूर्वक आभार मानते.
शेवटी एवढेच…
“वारी विठ्ठलापर्यंत पोहोचवते, पण सेवा माणसामाणसांपर्यंत पोहोचवते. भक्तीने मन शुद्ध होते आणि अवयवदानाने दुसऱ्याचे आयुष्य उजळते.”
चला… विठ्ठलनामाबरोबरच जीवनदानाचाही संदेश घराघरात पोहोचवूया.
“अवयवदान करा… कारण तुमचा शेवट कोणाच्यातरी नव्या सुरुवातीचे कारण ठरू शकतो.”
