” अमूल्य दान – अवयवदान “

“अवयवदान हे, अमूल्य दान आहे.”

अवयवदानामुळे कोणालाही नवीन जीवन मिळू शकते.” देशात अपघातात दररोज हजारो लोकांचा मृत्यू होतो. ज्यांचे अवयवदान इतर लोकांना जीवनदान देण्यात उपयुक्त होऊ शकते. एक दाता कमीतकमी सात लोकांचे प्राण वाचवू शकतो.

दान करण्यासाठी प्रमुख अवयव

एखादा रुग्ण ब्रेनडेड घोषित केल्यानंतर . त्याचे अवयव इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले जातात. त्यास कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट म्हणतात. ब्रेनडेड रुग्णांमध्ये हृदयक्रिया चालू असल्याने मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी यासारख्या प्रमुख अवयवांसोबत नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचे दान होऊ शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे, लाईव्ह डोनर सुद्धा आपले अवयव जसे मूत्रपिंड (Kidney), यकृत (Liver) कुठल्याही शारीरिक अपंगत्वा शिवाय दान करू शकतात. जिवंत व्यक्ती अवयव दान करते तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवाला धोका नसतो, हे समजणे फार महत्वाचे आहे.

अवयवदानातील समस्या

लोकांमध्ये योग्य जनजागृती नसल्या कारणाने, लोकांना अद्यापही आपल्या शरीराचे दान कसे करतात याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे काही लोक याचा चुकीचा विचार करतात.

मी, आज तुमच्या सोबत माझ्या आयुष्यातील एक बिकट अनुभव सांगणार आहे. दोन महिन्यांपूर्वी माझ्या पतीची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे. तर त्याहून आधी आपण थोडं मागे जाऊया, ह्या सगळ्या विवंचनेची सुरुवात मागच्या वर्षी झाली. मागील वर्षी मार्च महिन्यात आम्हाला कोरोना झाला होता. आम्हाला म्हणजे मी, माझे पती राजेश आणि माझा मुलगा अक्षय. त्यात राजेशला त्रास जास्त असल्यामुळे त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं. तेव्हा लक्षात आलं की त्याला कावीळ देखील झालेली आहे. उपचारादरम्यान डॉक्टरांना लक्षात आलं की राजेशला लिव्हरचाही त्रास आहे. कोविड आणि कावीळच्या उपचारा दरम्यान यकृताला खूप इजा झाली होती, डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे राजेशचा लिव्हर सिरोसीसचा त्रास प्रबळ झालेला आहे आणि लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय काहीही पर्याय नाही. तेव्हा हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली, काहीही सूचत नव्हतं.

मग आम्ही इतर तज्ञ डॉक्टरांचे सेकंड ओपिनिअन घ्यायचं ठरवलं. पण त्यांनीही असाच सल्ला दिला की ट्रान्सप्लांट हाच एकमेव पर्याय आहे. मग तिथून पुढे आमची ट्रीटमेंट ला सुरुवात झाली.

आम्हाला डॉक्टरांनी सर्व गोष्टींची कल्पना दिली. ट्रान्सप्लांट करण्याकरता कुठल्या गोष्टींची पूर्तता करावी लागते आणि त्याबाबत सर्व गोष्टींची सखोल माहिती दिली. झेडटीसीसी म्हणून एक सरकारमान्य संस्था आहे. त्यामार्फत आपल्याला ब्रेनडेड पेशंटचे अवयव मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते. त्या पध्दतीच्या ट्रान्सप्लांट ला कॅडेव्हर ट्रान्सप्लांट म्हणतात. तिथे मग आम्ही नोंदणी केली. सुरुवातीला काही दिवस सगळं छान चालू होतं पण ऑगस्ट महिन्यात राजेशची तब्येत खूप खालावली आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की आपण कॅडेव्हर साठी थांबू शकणार नाही.

आपल्याला लाईव्ह डोनर बघावा लागेल, मग त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू झाले. कुठल्याही प्रत्यारोपणा मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो रक्तगट तो तांत्रिकदृष्ट्या डोनर आणि रेसिपियंटचा सुसंगत असावा लागतो, डोनर पूर्णपणे निरोगी असावा लागतो आणि त्याचं वय हे १८ वर्ष आणि त्यापुढील असावं लागतं. आम्ही जेव्हा लाईव्ह डोनरसाठी घरात चर्चा करायचो तेव्हा आमचा मोठा मुलगा वरुणही (वय फक्त १९ वर्ष) चर्चेत सहभागी असायचा आणि जेव्हा त्याला कळालं की बाबांना लाईव्ह डोनरची गरज आहे. तेव्हा तो स्वत:हुन पुढे आला आणि डोनेट करण्यासाठी आपली इच्छा बोलून दाखवली.

परंतु रेसिपियंटची पत्नी आणि डोनरची आई अशा दुहेरी मनस्थितीत मला काहीही सूचत नव्हतं कारण एकीकडे पती साठी आनंद होता आणि दुसरीकडे काळजी की मुलाला भविष्यात काही त्रास तर होणार नाही ना. पण जेव्हा डॉक्टरांनी सगळ समजावून सांगितलं तेव्हा खात्री पटली की त्याला भविष्यात काहीही त्रास होणार नाही. अवयवदान करण्याचा निर्णय सोपा नसतो पण हीच वेळ असते जेव्हा आपल्याला शांत राहून खंबीरपणे निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय आमच्या मुलाने घेतला.

त्याच्या महत्वपूर्ण निर्णयाने आम्हा सर्वांना फार मोठा आधार मिळाला आणि १८ फेब्रुवारी २०२२ ला माझ्या पतीची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुखरूप पार पडली. आज दोघेही अतिशय व्यवस्थित आहेत.

सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की दोन महिन्याच्या कालावधीत आमचा मुलगा वरुण शारीरिकदृष्ट्या इतका सक्षम झाला की तो त्याच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेरगावी स्थलांतरित झाला.

म्हणूनच मी इतकंच सांगेन की अशा परिस्थितीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आपल्या प्रियजनांचे प्राण वाचवावे.

एक महत्त्वाचं सांगेन, देव न करो पण आपल्या घरातील जर कोणी अपघातात अकाली गेलं तर त्वरित त्यांचे अवयवदान करून इतर लोकांचे / स्वजनाचे प्राण वाचवावेत.

अवयवदान केल्याने एखाद्याचे आयुष्य वाचू शकते. त्याचे महत्त्व दुर्लक्षित करू नये. समाजात अवयव दान करण्यासंबंधी जनजागृती करणे गरजेचेच आहे आणि त्या प्रमाणे अवयव दाना साठी योग्य प्रणालीस प्रोत्साहित केले पाहिजे. प्रत्येक वर्षी १३ ऑगस्ट रोजी अवयवदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

शेवटी एकच अमूल्य संदेश देईल,

” होऊ मानवतेचे पाईक करू अवयवदान ..

अवयवदान करून देऊ जीवनदान “.

धन्यवाद!

– अंजलि पाटील

X