…..and she WON! (Marathi)
….. आणि ती जिंकली
…..and she WON!
काश्मीर ते कन्याकुमारी,
प्रितीने पुर्ण केली सायकलवारी !
लढली ती अवघड वाटांशी,
झोपेशी आणि थकव्याशी,
लढली ती मनातल्या नको नको म्हणणाऱ्या
आवाजाशी अन् लढली ती
निसर्गाने दिलेल्या आव्हानांशी,
लढली ती शरीरातल्या बलानिशी,
आणि ते कमी पडल्यावर मनाच्या सामर्थ्यानी,
….आणि ती जिंकली
…..आणि ती जिंकली।।
अकराव्या दिवशी दुपारपासून मोहीम संपेपर्यंत
एकूण अंतर – जवळ जवळ ३५० कि. मी
सायकलवरील एकूण वेळ – जवळ जवळ ४० तास
मोहिमेचे एकूण अंतर – ३७०० कि. मी. हून जास्त
संपूर्ण मोहिमेचा कालावधी – ११ दिवस २२ तास २३ मिनिटे
रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – शूलगिरी, कृष्णगिरी, कावेरीपट्टम, सालेम, कावेरी नदिवरचा पूल, मनमंगलम, तिरुमंगलम, सत्तूर,कायथर, अर्जुंग्रामम, करुणपुरम
आतापर्यंतची पार केलेली राज्ये – जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू
प्रितीला आता कन्याकुमारीच्या समुद्रकिनाऱ्याची ओढ लागली होती पण प्रवास वाटला तितका सोपा नव्हता.
तिनेक वर्षापूर्वी प्रितीने हि मोहीम ग्रुप बरोबर केली आहे. तेव्हा १७ दिवस १७ तास लागले होते आणि आता बारा दिवसात ती हे असाध्य साध्य करायला निघाली आहे.
ग्रुप मध्ये खेळीमेळीत, निकोप स्पर्धा ठेऊन, एकमेकांना प्रोत्साहन देत, उत्साहच्या वातावरणात हि मोहीम करणे आणि एकट्याने, स्वतः स्वतःला रेटणे, मनोबल कायम ठेवणे आणि पूर्ण करणे यात खूप फरक आहे. याला लागते प्रचंड जिद्द, धाडस, दॄढ मनोबल, स्वतःवरचा अभेद्य विश्वास!
मी मी म्हणणारे ऊन, दमट वातवरण, वेगावर मर्यादा आणणारे वारे यामुळे तिच्या वेगावर थोडा परिणाम झाला होता पण तिला कोणी अडवू शकेल असे काय?
दुपारी फक्त जेवणाची विश्रांती घेतली आणि ती पुढे चालतच राहिली. संध्याकाळ झाली आणि रात्र पडली. रात्री १०.३० च्या सुमाराला तामिळनाडू पोलिस सेक्युरिटी वॅनने तिला पाहिले आणि आश्चर्यचकित झाले.जेव्हा तिच्या या मोहिमेबद्दल आणि अवयव दानाच्या उद्देश्याबद्दल त्यांना माहीत पडले तेव्हा ते अगदी निशब्द झाले.
रात्री ११ च्या सुमाराला तिने दोनेक तासांची झोप घेतली. पहाटे की रात्रीच २ वाजता पुन्हा प्रवासाला सज्ज झाली.
सकाळी १०.३० वाजता रोटरी क्लब मदुराइ ईस्ट आणि वेस्ट कडून तिचा सत्कार करण्यात आला. या हि प्रसंगी तीने स्वत्तः आपल्या उद्देश्याबद्दल जनजागृतीचा प्रयत्न केला. मी थकली आहे असा सूर अजिबात कोठेही नव्हता. हा अपवाद वगळता ती कोठेही थांबली नाही.
सलगच्या १३ तास प्रवासाने ती थोडी थकली होती आणि उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून टिम तिला दर तास दिडतासाने पेये देत होती जेणेकरुन तिला तकवा राहावा. या वेळी तिला लागलीच उर्जा मिळावी आणि खाऊन सुस्त वाटू नये म्हणून हलका आहार दिला जात होता. थोड्या थोड्या वेळाने आता ती काही मिनिटांसाठी विश्राम घेत होती.
संध्याकाळनंतर टिमचा प्रयत्न असा होता की मोहीम पूर्ण झाल्यावर झोपेची मोठी विश्रांती घेऊया तोपर्यंत थोडे ताणूया. कारण आता ती थांबली तर परत लवकर उठणं आणि निघणं शक्य होणार नाही. एकदा सूर्योदय झाला की उन्हात प्रवास करणे मुश्किल होईल.
ती अत्यंत थकली होती पण थोडी थोडी विश्रांती घेऊन का होईना ती चालवतच राहिली. रात्री ११ च्या सुमारास तिने झोप घेण्याचे ठरवले. अर्धा तास झोप घेऊन तिचा प्रवास सुरु झाला.
यानंतर पुढचे ४-४.५ तास तिच्याशी बोलत राहून, सतत तिला बोलण्यात गुंतवून ठेवत राहिले. जेव्हा जेव्हा असे वाटले की ती आता थांबेल त्या त्या वेळी तिला पायी सायकल घेऊन चालत रहायला लावले.
१२ दिवसांचा थकवा, अपुरी झोप, उणे ८ मधून निघून ते अगदी ३४-३५ डिग्री पर्यंत असे बदलेले तापमान, दमट हवामान, घाट-वळणे- चढ असलेला रस्ता या सगळ्यांनी तिची कसोटी पाहिली. ही. मोहीम अतिशय आव्हनात्मक आहेच आणि त्यातल्या त्यात एकट्याने करावी आणि तीही इतक्या कमी वेळात यासारखे अवघड दुसरे काही नाही. हे करत असतांना पुढे काय? पुढची मोहीम कोणती करावी एवढाच विचार तिच्या मनात सतत घोळत होता. एवढे दैदीप्यमान यश मिळवूनही पाय जमिनीवर असण्याइतका साधेपणा, विनम्रपणा, बोलण्या वागण्यातील सहजता , काहीतरी भव्य मिळवल्याचा आविर्भाव नसणे ह्या गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत.
तिला जेव्हा विचारले कि तिला मोहिमेदरम्यान कधी ताण तणाव जाणवला का? कधी मनात शंका आली का ? तेव्हा तिने एकदम खरे उत्तर दिले की, हो पहिल्या तीन दिवसात चांगला वेग असतांना, समाधानकारक अंतर पार पडल्यावर चौथा दिवस कमी अंतर कापणारा ठरला तेव्हा तिला ताण जाणवला, थोडी भीतीहि वाटली की सगळे योजल्याप्रमाणे पार पडेल काय आणि त्यामुळे तिने प्रयत्नात कसूर ठेवली नाही.
तिचा धीर सुटू नये म्हणून थोडं राहिलय थोडच राहिलय म्हणत तिला सांगत सांगत किनाऱ्यापर्यंत (finishing line)पर्यंत आणले. ज्या क्षणाची ती आणि सगळे आतुरतेने वाट बघत होते शेवटी तो क्षण आला. पहाटे समुद्रकिनारी सूर्य उगवण्याच्या वेळी ६ वाजता आपला तारा हि चमकत होता.
शब्दांकन – कविता पिपाडा