B.O.Y. चं नातं –भाषा, प्रांत, वय या पलीकडच
B.O.Y. ची घोडदौड (bike दौड) यशस्वीपणे चालू आहे. आज B.O.Y. चा मुक्काम कोची शहरातल्या श्री दिपू नायर यांच्या घरी होता. श्री दिपू आणि त्यांची पत्नी सौ श्रुती ReBirth च्या B.O.Y. च्या स्वागताची आणि राहण्याची सर्व तयारी करून वाट पाहत होते. त्यांच्या मनात खूप उत्सुकता होती.
महाजन काका.. वय वर्ष ६८, ReBirth चे प्रचारक, स्वतः एक किडनी दानाचं महान कार्य केलेले..
त्या दोघांना थोडं दडपण आलं होतं.. काका कसे असतील? आपल्यासोबत adjust होतील ना? आवडेल ना त्यांना आपलं घर, पाहुणचार? आपण इतक्या मोठ्ठया माणसाबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं ?
दिपू दिवसभर काकांसोबत होते. रात्री ते काकांना घेऊन घरी आले. दिपूने आणि श्रुतीने खूप आदराने काकांचे स्वागत केले. “काका , आमचं घर, पाहुणचार गोड मानून घ्या” अशी प्रेमळ विनंती केली. काकांचे यावर उत्तर होतं.. “माझ्या मुलीच्या घरी आलोय, मग छानच असणार” !
दोघेही एकदम भारावून गेले.
ReBirth चा झेंडा घेऊन, अवयवदानाच्या प्रसाराचं वेड पाठीशी बांधून मैलोन–मैल प्रवास करायला सिध्द झालेला हा ‘अवलिया’ एकदम घरातला, जवळचा होऊन गेला.
भाषा, प्रांत, वय, शिक्षण यातली अंतरं क्षणात मिटून गेली.
दिपू ( Brutechain solo rider), गॉडविन (Mojo Tribe Kochi chapter rider) आणि त्यांच्या biker ग्रुपची उत्साही मित्रमंडळी काल दिपू च्या घरी काकांना भेटायला जमली होती. जेवण वगैरे आटोपलं. या सर्व मंडळींना वाटलं.. काका दमले असतील, थोडं बोलून झोपून जातील.
पण दमणारा तो B.O.Y. नव्हेच!!
काकांनी त्यांना जमेल तशा मराठी मिश्रीत हिंदी आणि इंग्लिश भाषेत ‘स्वतः च्या जगण्याचं सार, organ donation प्रचाराचा निर्धार, त्यामागची तळमळ आणि जवानांविषयीची कृतज्ञता म्हणून स्वतःची दान केलेली एक किडनी … सर्व सर्व सांगितलं.
जमलेले सर्वजण काकांचा प्रत्येक शब्द कान देऊन ऐकत होते. मनात साठवत होते. अंगावर रोमांच उभे राहावेत असा तो प्रसंग!!
भाषेच्या पलीकडचा.. भावनांचा तो संवाद होता..
निःशब्द असूनही खूप बोलका आणि आत खोलवर पोहोचणारा !
कोचीमधली २९ जानेवारीची पहाट या सर्व सुंदर आठवणी जपून ठेवत आणि मनातील कोंदण चांदण्यात उजळत उजाडली.. B.O.Y. ला निरोप देण्यासाठी सर्वजण जमा झाले. समाधानी आणि हृद्य अंतःकरणाने काकांनी मुलीच्या घराचा निरोप घेतला.
आता पुढचा टप्पा होता तिरूअनंतपूरम!
Bike वरून काका ,दिपू आणि गॉडविन नदीच्या तीराकडे निघाले. सर्वांनी काकांना पुन्हा एकदा नमस्कार केला आणि B.O.Y. चं काम असंच अविरत चालू राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
B.O.Y. ची, ReBirth आणि Organ Donation चा संदेश देणारी सजलेली bike, आता तरफेतून नदीपार होणार होती. लॉन्च आली.. काका, दिपू आणि गॉडविन bike घेऊन लॉन्चमध्ये चढले. सगळे लोक B.O.Y. आणि bike कडे कुतूहलाने पहात होते.
गेल्या ११ दिवसात एकूण १६१६ किमी प्रवास करून B.O.Y. ला इथपर्यंत घेऊन येणारी ती bike, त्यावर ReBirth चा झेंडा घेऊन प्रवास करणारे आमचे महाजन काका !!
कोण कुठले दिपू आणि गॉडविन, पण आज प्रेमाच्या धाग्यांनी काकांशी जोडले गेलेले ते दोघे आणि या सर्वांना ऐलतीरावरून पैलतीरावर घेऊन जाणारी ती नाव..
एक अजब नातं सांधून चाललीय !!!
Day 012
Kochi to Thiruvananthapuram | 199 kms
अस्मिता फडके–ताटके
Software Professional, Pune
किल्ले भटकंती, सामाजिक कार्याची आवड,
ReBirth Volunteer
Add Comment