B.O.Y. – “Heart to Heart थेट भेट”

काका कोचीवरून निघून लॉन्च मार्गे तिरुवनंतपुरम कडे निघाले. त्यांचा आजचा मुक्काम तिरुवनंतपुरम पासून 30 किमी अलीकडे अटींगल (Attingal) गावी होता.

प्रवास चालू झाला. हा मार्ग थोडा अरुंद रस्त्याचा, दाटीवाटीने वसलेल्या बैठया घरांचा, नारळी, सुपारीच्या झाडांनी सजलेला पण बऱ्यापैकी रहदारीचा. काकांना इथली स्वच्छता आणि वाहतुकीची शिस्त खूप प्रकर्षाने जाणवली आणि लोक ती पाळतात हे त्यांनी आवर्जून सांगितलं.

अशा रहदारीच्या रस्त्यावरून प्रवास करताना आमचे काका कुठल्या मोठ्ठया हॉटेलमध्ये चहापाणी घेण्यासाठी कधीच जात नाहीत. गर्दीच्या ठिकाणी एखादी छोटी चहाची टपरी गाठतात, गाडी उभी करतात आणि थेट भेट सुरू होते.

काकांची ReBirthमय गाडी, त्यावरचे Organ Donation चे विविध फलक, काकांचं वेगवेगळे बॅजेस असलेले जाकीट…

कुठल्याच सोपस्काराविना मग ही अजब सभा सुरू होते. लोक कुतूहलाने ऐकतात, एकरूप होतात..

ककांचं खूप सोप्पं तत्व आहे. पाण्यात पाणी मिसळावं तसं आपण लोकांमध्ये मिसळून जावं.

आजच्या चहाच्या टपरीवर अशीच अनोखी गर्दी झाली आणि लोक काकांशी हातवारे करत हितगुज करीत होते.. त्यात तो चहावाला पण होता.. एका बाजूला हा मेळा दंग झाला होता आणि तिकडे त्याचा चहा उतू गेलेला त्याला कळलेच नाही. मग सगळी पळापळ..

पण तरीही त्या चहाच्या टपरी वरील अम्मा आणि आप्पानी काकांना प्रेमाने चहा–बिस्किटे दिली, देऊ केलेले पैसे काकांना परत केले आणि कृतज्ञतेने निरोप दिला.

इतका सहज संवाद साधत काका मार्गक्रमण करतात, लोकांच्यात लोकांचेच होऊन जातात आणि हृदयातून हृदयापर्यंत संदेश पोहोचतो, हेच B.O.Y. च्या सफलतेचं मूळ गमक !!

काका मजल दर मजल करत 199 km च अंतर पार करून अटींगल या तालुका ठिकाणी संध्याकाळी ४ ला पोहोचले. तिथे विपीन अझाथी ( Bipin Azhathi from Motors club, Trivandrum) यांनी त्यांचं स्वागत केलं. आजचा मुक्काम विपीन यांच्या घरीच होता.

विपीन आणि त्यांच्या पत्नीने रात्री जवळच्या नातेवाईकांसोबत घरीच छान जेवणाचा बेत केला. जाताना विपीनच्या आईवडीलांनी जवळच असणाऱ्या त्यांच्या मनंबूर या गावी भेट देण्याचा प्रेमळ आग्रह केला.

अटींगल हे ठिकाण तिरुवनंतपुरमचं स्वातंत्र्यपूर्वीपासूनचं महत्त्वाचं सरकारी ठाणं! दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम अजून final व्हायचे होते. विपीन जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले आणि लगेचच स्टाफसोबतचा कार्यक्रम पक्का झाला.

31 जानेवारी ला सकाळी 10 वाजता विपीन ने Sree Gokulum Medical Mission हॉस्पिटलच्या स्टाफसोबत काकांचा गप्पांचा कार्यक्रम आयोजीत केला होता. डॉक्टर्स, नर्सिंग staff, सपोर्ट staff अशी 60–70 मंडळी कार्यक्रमाला हजर होती. प्रतिसाद छान मिळाला.
त्यानंतर लगेचच Sivagiri SreeNarayana Medical Mission Hospital येथे काकांचा interview झाला. दुसऱ्या दिवशी लोकल पेपर्स आणि TV चॅनेल्स – Maathrubhumi, Asianet Cable TV, Sivagiri TV – वर मोठ्ठं coverage मिळालं.

कार्यक्रमानंतर विपीन आणि काका समुद्रावर फेरफटका मारून आले आणि काकांची लाडकी bike आता विपीनच्या आई–वडिलांच्या गावी मनंबूरच्या दिशेने ४०किमी चा प्रवास करू लागली.

मनंबूर हे त्यामानानं छोटंसं गाव. विपीनच्या आई–वडिलांचं शेतावरचं टुमदार घर, घराभोवती नारळ, सुपारी,केळी, फणस,आंबा, अशी झाडांची दाटी. गायी–म्हशी, कोंबड्या, बदकं असे सवंगडी!! काका हाडाचे शेतकरी त्यामुळे त्यांना हे खूप भावलं. नकळत स्वतः च्या घराची, शेताची आठवण तरळून गेली.

काकांशी जेव्हा घरच्यांविषयी बोलले, तर म्हणाले.. माझी सगळी माणसं खूप चांगली आहेत. मी Organ Donation च्या प्रचाराच्या वेडापायी असा भटकत असतो. पुण्याची मोठी मुलगी दिवसातून एकदा संध्याकाळी फोन करते आणि बाकी सगळ्यांना खुशाली कळविते. नातवंडं media, पेपर मधले माझे फोटो घेऊन गल्लीभर आनंदाने सांगत सुटतात..

काकांचं तत्व एकच.
ज्या कामासाठी बाहेर पडलो ते महत्त्वाचं, पुढे पुढे जात राहायचं, आपण ठरविलेले काम नेटाने करत रहायचं!
काकांशी संवाद खूप काही शिकवून जातो. अगदी सीमित गरजा, कसलाच बडेजाव नाही, छोट्या छोट्या गोष्टीत समाधान शोधण्याची वृत्ती आणि थेट संवाद !!

रात्री विपीन च्या घरी मुक्कामास आलेले काका, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चहा घेऊन निघण्याच्या विचारात होते. विपीन आणि त्यांची पत्नी दोघेही 8 वाजता कामावर निघणार हे माहीत असल्याने त्यांना त्रास नको हा यामाग चा हेतू !
पण सकाळी उठून पाहतात तर काकांसाठी सकाळीच गरम गरम आंबोळीचा बेत तयार होता. ही आग्रहाची आणि प्रेमाची भरपेट न्याहरी घेऊन, दोघांना आशीर्वाद देऊन काकांचा मोर्चा आता निघाला पुढंच्या मुक्कामी, Tirunelveli near Thoothukudi !!

Day 013
Thiruvananthapuram, Kerala

~अस्मिता फडके–ताटके

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

X