Curtain Raiser #ANJBharatOrganYatra

Curtain Raiser! पडदा उघडत आहे

Nothing to lose and a world to see!!


शंभराहून अधिक सायकलपटूंच्या उपस्थितीत अवयव दानाच्या जनजागृतीसाठी आणखी एक विश्वविक्रमी मोहिमेच्या फ्लॅग ऑफ समारंभा नंतर टीम पुढील प्रवासासाठी सज्ज

करी जगी भ्रमण, नाही हिंमतीची चणचण

भेटाया उत्तर ते दक्षिण, घाली आकाशाला गवसण

तारीख – 4 फेब्रुवारी,
स्थळ – शनिवारवाडा
वेळ – सकाळी साडे सहाच्या सुमारास

सूर्य अजून वर आला नाहीये पण एक तारा चमकायला सज्ज होत आहे…..

घड्याळाचा काटा पुढे जात आहे आणि गर्दी होत चालली आहे.
वातावरणात उत्साह संचारलेला आहे आणि आता एकच वाट आहे ती म्हणजे त्या ताऱ्याच्या आगमनाची.

हा तारा आहे प्रिती म्हस्के! गिनीज बुक मध्ये नाव असणारी आणि आता आणखी एक नवीन विक्रम आपल्या नावे नोंदवण्याची मनीषा असणारी एक असामान्य जिद्दी महिला. एखाद्याने स्वतःच्या नावासाठी, छंदासाठी परिश्रम करणे हे काही नवीन विशेष नाही. पण एका ध्येयासाठी अत्यंत अवघड शिवधनुष्य पेलणारी व्यक्ती अगदी विरळीच.

हे शिवधनुष्य आहे काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास अवघ्या दहा दिवसात पूर्ण करण्याचे तेही सायकल वरून!!

शंभराहून अधिक सायकलपटू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून शनिवारवाड्याकडे निघाले आहेत. रिबर्थ चे स्वयंसेवक धावपळ करताना दिसत आहेत.

आयपीएस ऑफिसर झोन 1 श्री गिल साहेब, माजी आमदार सौ मेधा कुलकर्णी, इएमएस (108 एम्बुलेंस)अधिकारी, श्री ज्ञानेश्वर शेळके, राजाभाऊ कदम, एएनजे चे अधिकारी, रोटरी क्लब नॉर्थ आणि सिनर्जी चे अधिकारी असे शहरातील अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले आहेत.


प्रितीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि ‘फ्लॅग ऑफ सोहळा’ संपन्न झाला.

प्रितीचा आणि तिच्या चालक दलाचा प्रवास सुरु झाला. दिल्लीवरून उधमपूरचा प्रवास साधारण ६०० किमी निर्विघ्न पार पडला.

उधमपुरला स्थानिक आणि प्रतिष्ठित लोकांना रिबर्थ संस्था आणि तिचे अवयव दानासंबंधीच्या कार्यासंबंधी माहिती देण्यात आली.

उधमपुरहून श्रीनगरचा प्रवास सुरु झाला. मार्ग होता काझी कुंड- बनिहाल बोगदा- श्रीनगर. हा रस्ता होता पांढऱ्या शुभ्र बर्फाने आच्छदलेला, अंगाला झोंबणारे गार वारे, झिमझिम पाऊस, मोकळा रस्ता हे वर्णन ऐकायला किती छान वाटतय पण अशा वातावरणात शून्य डिग्री तापमान, अवघड वळणे, खराब रस्ता आणि सायकलचा प्रवास ही कल्पनाच धडकी भरवणारी आहे, पण प्रिती ह्याला घाबरणारी नाही. तिच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती, दृढ मनोबल आणि असंख्य हितचिंतकांच्या शुभेच्छा ही तिची बलस्थाने (सुपरपावर्स) आहेत.

आता फक्त उद्या निरभ्र आकाश हवे आहे कारण आमचा तारा चमकायला सज्ज आहे!


लहरेन मी
बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी!

– Mrs. Kavita Pankaj Pipada

X