उत्तुंग ध्येयाला प्रयत्नाचे आणि अंतराचे काय बंधन!

ध्येय उंच असले की,

झेप देखील उंचच घ्यावी लागते.

प्रितीची नवी भरारी- भूतानहून सुरु झाली सायकलवारी

पार केलेले एकूण अंतर – साधारण १५० किमी

सायकलवरचा एकूण वेळ – ७-८ तास

वेळ -सकाळी पाचची

स्थळ – थिम्पू, भूतान

सूर्योदय नुकताच झाला आहे आणि प्रिती तिची सोलो क्रॉस कंट्री मोहीम सुरु करायला सज्ज आहे. प्रिती, भूतान ऑलिंपिक असोसिएशनचे काही सदस्य, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट दंतकचे जसविंदर सिंह, डॉ. यांच्या उपस्थितीत फ्लॅग ऑफ होत आहे आणि अचानक काही मुंबईकर हि या अदभुत सोहळ्याला हजेरी लावायला उपस्थित झाले आहेत. हे मुंबईकर तिला आदल्या दिवशी तिच्या मुक्कामाच्या होटेलवर भेटले होते. त्यांनी अवयव दानाच्या या चळवळीला आणि प्रितीला आपल्या शुभेच्छा तर दिल्याच होत्या पण अशा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे ठरवले आणि प्रितीचा आनंद आणि उत्साह देखील वाढवला.

हि मोहीम सोलो अर्थात एकटीने पार पाडण्याची असल्याने प्रिती बरोबर कोणतीही गाडी नव्हती आणि रस्ता तिला तिचाच शोधायचा आणि ठरवायचा होता. वातावरण अल्हाददायक होते पण अचानक पाऊस सुरु झाला आणि नेहमीप्रमाणे प्रितीच्या जिद्दीची परीक्षा चालू झाली.

पुढचे चार तास सलग पाऊस चालूच होता आणि वाढतच चालला होता. पावसामुळे रस्त्यात बराच चिखल झाला होता आणि तो सायकलच्या चेनमध्ये अटकत होता. यामुळे प्रितीला सायकल चालवण्यास अडथळा निर्माण होत होता. प्रितीने पायडल उलटे चालवून ते नीट करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात सायकलची चेनच तुटली. सोलो जात असल्याने  सामान नेण्यावर थोडे निर्बंध आले असल्याने प्रितीने फक्त पंक्चर किटच बरोबर ठेवले होते आणि चेन संबंधित सगळी हत्यारे गाडीत होती जी तिच्याबरोबर चालत नव्हती फक्त मुक्कामी भेटणार होती.

प्रितीने पुढे सायकल ओढत नेत दुरुस्तीसाठी गॅरेज शोधले पण ते होते चारचाकी वाहनांसाठी मग तिने एक शक्कल लढवली आणि सायकल दुरुस्त करणाऱ्या मेकेनिकशी या गॅरेजवाल्यांचा वीडियो कॉल द्वारे संपर्क साधून दिला.

दिड दोन तासाच्या खटपटीनंतर त्यांना यश आले आणि सायकलची तात्पुरती दुरुस्ती झाली आणि प्रिती पुढच्या प्रवासाला निघाली. पुढचा प्रवास थोडा चढ असणारा होता, काही किमी अंतर गेल्यानंतर चेकपोस्ट आले पण गाइड तेथे पोहचला नसल्याने प्रितीला पुढे जाण्याची परवानगी मिळत नव्हती. भूतानमध्ये नियमाप्रमाणे महत्त्वाची ठिकाणे क्रॉस करायला स्थानिक गाइड असणे बंधनकारक आहे.

प्रितीच्या मोहिमेबद्दल आणि अवयव दानाच्या कार्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तिथले अधिकारी तिला जाऊ देण्यास तयार झाले पण सायकल सोबत देण्यास तयार नव्हते. आणखी तासभरानंतर बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन आणि भूतान रोड सीनियर अधिकारी यांच्या मदतीने तिने चेकपोस्ट क्रॉस केला आणि पुढे ५-६ किमीवर जेवण्यास थांबली.

रस्त्यात शक्य तेथे थांबून रिबर्थ संस्थेची माहिती देत चालली होती.  स्थानिक लोकांशी बोलत चालल्याने तिला गेडू आणि तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांबद्दल कळाले आणि तिथे ती विश्रांतीसाठी थांबली. हे अधिकारी एनडीए मध्ये होते आणि त्यांना अशा मोहिमेत रस असल्याने त्यांनी प्रितीचे यथोचित स्वागत केले आणि चहा फराळाची सोय केली.

संध्याकाळी. साडेसहच्या सुमाराला भूतान पार करुन प्रिती बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या गेस्ट हाउसला मुक्कामी थांबली. पाहिला दिवशी तेरा तासातून ७-८ तासच ती सायकल चालवू शकली. अपेक्षेहून थोडे कमी अंतर पार केल्याने पुढील दिवसात या वेळेची भरपाई कशी करता येईल सध्या हा एकच विचार तिच्या डोक्यात चालला आहे.

“कुछ तो आरज़ू रख, थोड़ा हौसला रख,

ज़िंदगी जीने का अपना तरीका रख II”

शब्दांकन – कविता पिपाडा

X