नवा दिवस नवी सकाळ।रोज करी अवयवदानाचा प्रसार ॥
भूतान फत्ते आता मिशन नेपाळ!
एकूण प्रवास – साधारण १६०-१७० किमी
सायकलवरील अंदाजे वेळ – १३ ते १४ तास
रस्त्यातील महत्त्वाची ठिकाणे – हासीमारा, जलदमारा नॅशनल पार्क, बिरपारा, गैरकाटा, धुपगुरी, जलपायगुडी, बागडोगरा, सिलीगुडी
पाहिल्या दिवशी प्रिती जयगांव येथील गेस्ट हाऊस येथे मुक्कामी राहिली. या अगोदरच्या मोहिमांमध्ये तिचा मुक्काम रात्री अपरात्री काही तासानंपुरताच होता. या मोहिमेत तिला मुक्कामाचे ठिकाण शोधणे, स्वतःच्या जेवण्याची व्यवस्था बघणे या बरोबर आपले कपडे धूऊन वाळवणे, प्रत्येक वेळी मुक्कामाला थांबल्यावर सामान सायकलवरून उतरवणे आणि दुसऱ्या दिवशी परत चढवणे हि कामे सुद्धा स्वतःलाच करावी लागत आहे.
सकाळी ती साडे चारच्या सुमाराला तिने सायकल चालवायला सुरुवात केली. वातावरण थंड होते पण हेडविंड ( डोक्याच्या दिशेने येणारे)वारे वहात होते. एकंदरीत रस्ता चांगला होता पण सायकल पूर्णपणे दुरुस्त नसल्याने वेगावर मर्यादा होत्या.
रस्त्यात प्रितीला अनेक सायकलपटू भेटले. सायकलवर एकटी जात असणारी हि महिला अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. लहान मुले, स्थानिक लोक तिला हात उंचावून अभिवादन करत होते.
रस्त्यात प्रितीला एक विलक्षण जोडपे भेटले जे सध्या (गियर नसलेल्या) सायकलींवर यात्रा करीत आहेत. त्यांच्या या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बरोबर काही पैसे हि बाळगले नाही. प्रिती म्हणते मी एकटीच वेडी नाहीये असे मला आता जाणवले. माझ्यासारखे अनेक वेडे या दुनियेत आहेत.
तिला एकटीच सायकलवर पाहून अनेक लोक तिला माहिती विचारत होते. अनेक जणांना तिने रिबर्थ आणि अवयव दानाची माहिती दिली आणि रिबर्थच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याची विनंती देखील केली. यादरम्यान काही गमतीशीर गोष्टी झाल्या. काही जणांनी तिचे नाव गूगल करुन ती खरं सांगत आहे ना याची शहनिशा केली.
सिलीगुडीला पोहोचल्यावर तिने सायकल दुरुस्तीसाठी योग्य ठिकाण शोधायला लागली आणि तिला ट्रॅक अँड ट्रेल हि जागा सापडली. सायकलची चेन दुरुस्त करायला सांगून ती जेवायला गेली. परतल्यावर मॅकेनिकने तिला सायकलमधील आणखी बिघाडाची कल्पना दिली. या आधी प्रिती आवश्यक ती हत्यारे आणि सायकल दुरूस्त करू शकणारा आणि माहितगार व्यक्ती नेत होती आणि सोलो ट्रिप साठी फक्त (बेसिक)प्रारंभिक माहिती तिने जमवली होती. शक्य तितके आणि आवश्यक तितकी दुरुस्ती तिने करवून घेतली. निघतांना तिने काही वेळ आधी भेटलेल्या जोडप्यालाहि दुरुस्तीच्या ठिकाणी बोलवून घेतले आणि त्यांची हि सायकल नीट करुन घेतली.
एवढ्यात संध्याकाळ झालीच होती , एक चांगले ठिकाण पाहून ती मुक्कामाला थांबली. हे होते हॉटेल सनराइज. प्रितीला जेव्हा विचारले की या प्रवासात आतापर्यंत सगळ्यात मोठे आव्हान काय वाटते तेव्हा ती म्हणाली सगळ्या गोष्टींचे नियोजन स्वतः करणे. एकटे चालणे,रहाणे, खाणे, कपडे धुऊन सुकवून दुसऱ्या दिवसाची तयारी करणे, गुगलच्या मदतीने रस्ताच काय तर स्वच्छतागृह देखील शोधणे, वेळेवर परिस्थिती बघून निर्णय घेणे या सगळ्या गोष्टी आव्हनातामक आहेतच पण नव नवे अनुभव मिळवणे यातच या मोहिमेचे खरे यश आहे.
या अगोदरच्या मोहिमांमुळे तिला सायकलचा सराव झाला होता आणि नवे काहीतरी केल्याशिवाय खरा आनंद मिळाला नसता असेही ती म्हणते.
प्रितीला पुढच्या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा॥
शब्दांकन – कविता पिपाडा