एक आशेचा किरण….

तारीख ३१ डिसेंबर, २०२१ मला अमोल नावाच्या मुलाचा फोन आला होता. पुणे – निगडी येथील आयुर्वेदिक कॉलेज मध्ये BAMS च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.

या कॉलेज मध्ये आमचे २०१९ साली ReBirth चे अवयव दान या विषयावर लेक्चर झाले होते.

या मुलाची एक वर्ग मैत्रिण मुलगी दामिनी पोळ ३१ तारखेला मेंदूमृत (braindead)झाली.

दामिनीचा भाऊ महेंद्र इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. वय अवघे २४. वडील २०१३ मध्ये गेले. आई फक्त दहावी नापास. आर्थिक स्थिती बेताची. पण भाऊ बहीण प्रचंड हुशार, मेहनती. जेवढे सुशिक्षीत तेवढेच सुजाण. छोटया वयातच समाजासाठी काहीतरी करण्याची मनोमन इच्छा. दोघे भाऊ बहिण एकमेकांचे सच्चे दोस्त होते. दोघांनी घरी सांगून, अवयव दान करण्याची प्रतिज्ञा घेेतली होती. आणि आता वेळ आली होती..आपली प्रतिज्ञा अमलात आणण्याची.

महेंद्र खरच जिद्दीचा मुलगा. UPSC परीक्षेची तयारी करतोय. आयुष्यात पुढे काहीतरी नाव मिळवून समाजासाठी काही तरी करायचे..

ती देहू मध्ये एका हॉस्पिटल मध्ये admit होती. तिला सह्याद्री मध्ये हलवण्यात आले होते. ७२ तास महेंद्र लढत होता… प्रयत्न करत होता..की आपल्या बहिणीचे अवयव वाया जाण्यापेक्षा दान व्हावेत..कोणाला तरी नवी जिंदगी मिळावी..अगदी तिचे डोळे तरी देता यावेत.. नातेवाईक, समाज, या साऱ्यांचे येणारे प्रेशर, बहीण गेल्याचे दुःख, स्वतःचा स्वतःशी चाललेला वाद संवाद…जे करतोय ते बरोबर आहे का.. अनेक प्रश्न… आर्थिक अडचणी…या साऱ्या गोष्टींचा तो सामना करत होता… त्याचा उद्देश फक्त एकच होता….अवयव दान व्हावे.. आणि कोणा गरजू माणसाचे आयुष्य सुखाने जावे.

दामिनीच्या medical टेस्ट झाल्या पण इन्फेक्शन असल्यामूळे तिचे अवयव वैद्यकीय दृष्ट्या दान करण्यासाठी अपात्र ठरले. त्यामुळे दुर्देवाने अवयव प्रत्यारोपण नाही होऊ शकले. २ जानेवारीला दामिनी हे जग लौकिक अर्थाने सोडून गेली पण ती आणि तिचा भाऊ यांनी जे धैर्य दाखवले त्याने तेजाची वात तेवली गेली.

त्याची बहीण ही फार अल्पायुषी ठरली.. पण ती तिच्या नावाप्रमाणे ‘ दामिनी ‘ सम आयुष्य जगली.. लखलखाट करून गेली.

तिच्या फॅमिली ला salute. तिचा भाऊ महेंद्र याला मनोमन वंदन. तिच्या अमोल नावाच्या मित्राने बरेच प्रयत्न केले. त्याला ही सलाम.

असे अनेक महेंद्र जन्माला येतील. आणि त्याच्या मोबाईल च्या कॉलर ट्यून प्रमाणे लोकांना शिकवून जातील.

…हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे….

रीबर्थ जे अवयव दान प्रसाराचे काम करत आहे त्याचे रिझल्ट अनुभवयास मिळत आहेत, लोकांमध्ये जागृती तयार होत आहे याची नम्र जाणीव पण होत आहे.

हा नक्कीच एक आशेचा किरण आहे.

विवेक ताटके

X