पाय जमिनीवर…मन आभाळात!!

एकूण प्रवास –  २८० किमी

रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – परसाखेडा, फतेहगंज पश्चिमी,मिरगंज, धामोरा, दलपतपूर, गाजियाबाद

रात्री प्रिती बरेलीला मुक्कामाला होती. तिथून दिल्लीचे इंडिया गेट  साधारण २८० किमी दाखवत होते. बरेलीचा सायकल ग्रुप रात्री भेटायला आला. त्यांना या मोहिमेबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. रिबर्थ आणि अवयव दान याबद्दल प्रितीकडून ऐकल्यानंतर त्यांनी प्रितीला गावात चालण्याचा खूप आग्रह केला. गाव १५ किमी आत होते. त्यामुळे सकाळी निघायला साधारण ६ वाजले.

सकाळी प्रितीचे पती श्री दत्तात्रय मस्के यांनी तिला फ़ोन केला आणि म्हणाले मी तुझ्यासाठी काहीतरी लिहलय. वाचकांसाठी ती कविता येथे लिहीत आहे.

एक तुफान चला है,

एक तुफान को हराने,

हवाओंका रुख बदलने,

सूरज का ताप नापने।

हौसला है समुंदर को पीने का,

बादलोंको छुने का ,

अंधेरे को चीरनेका,

बारिश की बुंदे गिननेका।

हौसला है वादीयोंमे झांकनेका,

पहाडोंकी उंचाई नापनेका,

चांद के साथ चलनेका,

सूरज से भी ज्यादा चमकनेका।

हौसला है देश की सीमाओंको जोडनेका,

आराम की जिंदगी छोडनेका,

संकटोंसे टकरानेका और

खुद से लढनेका।

एक तुफान चला है,

एक तुफान को हाराने का,

बाधाओको झेलनेका,

कठिनाइयोसे खेलनेका,

हाथ की लकिरे मिटानेका,

खुद का नसीब खुद लिखनेका ॥

हौसला है , हिंमत आप दो,

ताकद है, दुआ आप दो,

ठान लिया है कर लेगी और थोडा लढ लेगी,

हवाओंको मोड लेगी, धूप से भीड लेगी ।

चार रेकॉर्ड लाये है, पाँचवा भी छिन लेगी॥

प्रितीचे मनोधैर्य अजून उंचावले. कुटुंब आणि सनेह्याच्या शुभेच्छा सतत तिच्या बरोबर होत्या. आता बरेलीहून निघतांना दिल्लीला कसेही करुन आज पोहोचायचेच असा निश्चय तिने केला.

बरेलीहून काही सायकलिस्ट गाडीने तिच्याबरीबरोबर निघाले आणि पुढचे ३० किमी वेगवेगळया चौकात जाऊन तिला शुभेच्छा देत होते. शेवटीं झुमका चौकात तिच्याबरोबर न्याहारी केली, तिच्याबरोबर फोटो काढले आणि तिला निरोप दिला.

दिवसाची सुरवात एकदम छान झाली होती, रस्ता चांगला होता, स्पीड चांगला होता त्यामुळे दुपारी १ वाजेच्या सुमारास १२५ किमी अंतर पार झाले होते. रात्री नऊ वाजेपर्यंत इंडिया गेटला पोहोचू असे प्रितीला वाटले. इंडिया गेटला रेकॉर्ड पुर्ण होण्याच्या क्षणी बीआरओ, तिथले ऑफिसर्सना तिने सांगितले की गाझियाबादला पोहोचल्यावर लोकेशन पाठवेल.

जे योजले ते सर्व तसे घडले तर प्रितीची मोहीम ती काय ? दिड वाजेच्या सुमाराला जोरात पाऊस सुरु झाला. नुसताच पाऊस नव्हे तर वादळ देखील होते. वादळ आणि हवेचा जोर इतका प्रचंड होता की प्रितीला तब्बल एक दिड तास एकाच जागी  उभे राहावे लागले.

ट्राफिक वाढली, प्रिती नखशिखांत भिजलेली होती, बॅग आणि सायकल भिजून चिखलाने माखले होते. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. पण तरीहि प्रितीचा निर्णय पक्का होता. सबंध दिवसात जेवणाची विश्रांती न घेता,थोड्या थोड्या वेळाने पाणी, सरबत पीत राहिली त्यामुळे थोडा तकवा राहिला आणि वेळ वाचला.

अजून १०० किमी अंतर बाकी होते. आता हा बिकट रस्ता पार करण्याचे धैर्य संपले होते. ओले कपडे, चिखलाने माखलेली बॅग आणि सायकल असा अवतार आणि दिवसभराचा थकवा यामुळे पन्नासेक किमी अंतर पार  करुन थांबू आणि राहिलेले सकाळी करू असे प्रितीला वाटले. पण रस्त्यात राहण्याची सोय नव्हती परत १५-२० किमी गावात जायचे, सकाळी परत तेवढेच चालवत यायचे त्यापेक्षा १० किमी जास्त चालवून इंडिया गेटपर्यंत पोहोचणे श्रेयस्कर असे प्रितीच्या कुटुंबीयांचे आणि स्नेह्यांचे मत होते तारीख बदलण्या अगोदर पोहचली तर रेकॉर्ड सुद्धा एक दिवस अगोदर पुर्ण होईल असे सगळ्यांनी प्रितीला सांगितले.

शेवटी मनोबलाने संकटावर मात केली आणि प्रिती रात्री पावणे बाराला इंडिया गेट वर पोहोचली. तेथे बीआरओ चे, आर्मीचे काही ऑफिसर्स, मित्रपरिवार, स्नेहीजन, ऑर्गन इंडियाचे काही सदस्य तिची वाट पाहतच होते. तिचा सत्कार केला. हि मोहीम पूर्ण करण्यास तिला १० दिवस १८ तास ५० मिनिटे तास लागले.

रात्री साडेबाराला ते तिला मुक्कामी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी तिच्या यशस्वी मोहिमेनिमित मोठा समारंभ आयोजित केला. रात्री अंधारात फोटो नीट नव्हते आले म्हणून दुपारी परत काढले. आता ती २-३ दिवस दिल्लीत  आहे नंतर मुंबईत तिचा सत्कार आहे.

प्रिती म्हणते आजवरच्या मोहिमांमध्ये ही मोहीम माझी सर्वात आवडती आणि आव्हनात्मक होती. छोट्या गावतल्या, सर्वसामान्य लोकांपर्यंत मी अवयव दानाचा संदेश पोहोचवण्यात यशस्वी झाले.

खूप ठिकाणी लोकांना माझ्याबद्दल कुतूहल होते काहींना विश्वास नव्हता तर ते गूगल वर खात्री करत होते. छोट्या छोट्या टपरीमालकांनी चहा पाण्याचे पैसे घेतले नाही. तुम्ही अवयव दानाबद्दल सांगून लोकांचा जीव वाचवण्याचे पुण्याचे काम करत आहात आम्ही याचे पैसे घेणार नाही असे म्हणत असत. एक रिक्षावाल्याने स्वतःचा फ़ोन नंबर दिला,पुढच्या मोहिमेत मदतीचे आश्वासन दिले. अनेकविध अनुभवांनी समृद्ध अशी हि मोहीम प्रिती आणि वाचकांच्या आठवणीत सदैव राहिल यात शंकाच नाही. हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल तोवर प्रिती पुण्यासाठी निघाली असेल आणि कदाचित पुढच्या मोहिमेचा विचार करत असेल!

शब्दांकन – कविता पिपाडा

NOTTO Felicitation

X