It never gets easier; you just get better! (Marathi)

संघर्षातून सामर्थ्याकडे !

प्रितीने केले हैदराबाद सर आता मोर्चा बंगलुरू कडे!

आठव्या दिवसाच एकूण प्रवास – २७० कि.मी.

सायकलवरील एकूण वेळ – जवळजवळ २० तास

रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – रामायमपेट, चेगुटा, मनोहराबाद, हैदराबाद

आतापर्यंत पार केलेली राज्ये – जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणाचा काही भाग

रविवारी टीम मध्ये आणखी एक महत्वाचा बदल झाला. प्रितीचे स्नेही श्री शंकर गाडवे हे प्रितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायकलवारीचा शेवटचा टप्पा पार करताना पाहण्यासाठी दाखल झाले.
प्रितीने रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमाराला सायकल चालवायला सुरुवात केली. महामार्ग असला तरी काही रस्ता थोडा चढाचा होता. रविवार असल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी होती. सिकंदराबाद आणि हैदराबादला जोडणारा हुसैन सागर रोड बंद असल्याने प्रितीला शहरातल्या रस्त्याचा वापर करावा लागला बायपास रस्ता वापरता आला नाही, सगळे सिग्नल पार करावे लागले त्यामुळे वेग थोडा कमीच होता.

संध्याकाळी प्रिती हैदराबादला पोहोचली तेथे तिथल्या स्थानिक सायकलिस्ट ग्रुपने तिला भेटून तिच्या या मोहिमेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि तिचा सत्कार केला. ग्रुप मधील श्री प्रसाद यांनी आपल्या दुचाकीवर प्रिती आणि टीमला जवळचा रस्ता (शॉर्टकट रस्ता) दाखवत शहरातून बाहेर जायला मदत केली. यामुळे प्रितीचा बराच वेळ वाचला आणि साधारण त्या वेळेत ४० कि.मी. अंतर ती पार करु शकली.
सबंध रस्त्यात प्रितीने फक्त दोन वेळा विश्रांती घेतली. एकदा अर्धा तास आणि एकदा दुपारच्या वेळेस अडीच तास झोप घेतली.

शंकर यांच्या म्हणण्यानुसार दिवसाच्या प्रवासापेक्षा रात्रीचा प्रवास थोडा सोपा असतो याचे महत्वाचे कारण आहे रात्री मार्गाच्या उलट दिशेने वाहणारे वारे (headwind) नसते.
दिवसा वातावरण आणि उन्हामूळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. दिवसा पाण्याची गरज रात्रीपेक्षा जवळ जवळ दहापटीने वाढते. तसेच रात्री मालवाहतूक करणाऱ्या गाड्या जास्त चालत असतात त्या एका विशिष्ट गतीत जात
असल्याने वेग कमी जास्त करावा लागत नाही सायकल स्थीर गतीने पुढे जाते आणि ठराविक वेग निश्चितपणे पाळला जातो, वेगावर मर्यादा कमी येतात.

रात्रभर प्रिती सायकल चालवत होती आणि तिचे स्नेही शंकर तिला झोप येऊ नये म्हणून मोबाईलवर गप्पा मरत होते. काही हलकेफुलके विनोद, जनरल गप्पा, पुढच्या काही मॅरथॉन आणि पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या स्पर्धा याच्याबद्दल चर्चा करत होते. प्रितिला तिच्या आवडत्या विषयात गुंतवून तिला रात्रभर चालवत नेले. टिमकडे अश्या मोहिमेत कामी येणाऱ्या बऱ्याच युक्त्या आहेत.

पुढचे मोठे आव्हान आहे बंगलुरूपर्यंतचा रस्ता. बंगलूरू साधारण ४०० कि. मी. दूर आहे, रस्ता चढाचा आहे त्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल त्याच्यापुढचा रस्ता बऱ्यापैकी उताराचा असल्याने प्रितीच्या सायकलीचा वेग वाढेल असे अपेक्षित आहे.

हा लेख तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत प्रिती तेलांगणाहून कर्नाटक राज्यात प्रविष्ट झाली असेल.

सितारों से आगे जहाँ और भी हैं
अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं

तही ज़िन्दगी से नहीं ये फ़ज़ायें
यहाँ सैकड़ों कारवाँ और भी हैं

शब्दांकन – कविता पिपाडा

X