सावधान! प्रितीची सायकलवारी नेपाळमध्ये जोरात

एकूण प्रवास – १६३ किमी

सायकलवरील अंदाजे वेळ – ११ तास (विश्रांतीसह)

रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे –  दमक, बेलबारी, इटहरी, बिरपूर

सकाळी साडे पाचच्या सुमाराला प्रितीने हॉटेल सनराइज सोडले आणि काठमांडूच्या दिशेने प्रवास चालू केला.

दुपार होता होता हवेतला उकाडा प्रचंड वाढला होता. ऊन मी म्हणत होते आणि प्रितीला घामाच्या धारा लागल्या होत्या. सुरवातीला तिने ५-१० मिनिटे थांबून प्रवास चालू केला. थोड्या वेळाने परत काही मिनिटे थांबून विश्रांती घेतली असे चार पाचदा झाल्यावर मग तिने दुपारी एक ते अडीच उन्हे कमी होईपर्यंत विश्रांती घेतली.

प्रितीची हि सोलो ट्रिप असल्या कारणाने ती स्वतः आपले सगळे सामान एका बॅगमध्ये बरोबर घेऊन चालत आहे. तिने सायकलला कॅरियर लावून घेतले नाही कारण त्यामुळे सायकलचे वजन वाढेल असे तिला वाटत होते. पण वजन मर्यादित ठेवण्यासाठी कॅरियर न लावण्याचा निर्णय तिला त्रासदायक ठरला.

ज्या सॅडलबॅगेत सामान होते ती सायकल सीटच्या आधाराने टिकली होती. जसजसे रस्त्यातील चढ उतार येत गेले बॅगेला हिसके बसू लागले आणि बॅग खाली लोंबकळू लागली आणि चाकाला घासू लागली. या घासण्याने सायकल चालवायला अडथळा निर्माण होत होता. सारखेच प्रितीला रस्त्यात थांबून बॅग परत नीट लावावी लागत होती आणि पर्यायाने बराच वेळ वाया जात होता.

संध्याकाळी ती महुली येथे मुकामाला पोहचली. रोज प्रिती ज्या महत्वाच्या ठिकाणाहून जाते तिथल्या अधिकृत सरकारी कार्यालयातून सही शिक्का घेते कि तिने सायकलवरून हे ठिकाण क्रॉस केले आहे. बरोबर सपोर्ट गाडी नसल्याने अशी कार्यालये शोधणे, त्यांना सहीसाठी विनंती करणे हि कामे प्रितीलाच करावी लागतात.

चार पाच पोलिस चौक्यांमध्ये जाऊनहि तिला सही मिळत नव्हती. शेवटी एका चौकीत तिने तिच्या अगोदरच्या सायकलवाऱ्या आणि गिनीज रेकॉर्ड बद्दल सांगितले. त्यांनी गुगलवर सगळी माहिती तपासून पाहिली. तिचा अवयवदानाचा उदेश्य लक्षात घेता त्यांनी सहकार्य करत तिला सही शिक्का दिला आणि तिला राहण्यासाठी हॉटेल दाखवण्यासाठी एक कॉन्स्टेबल सोबत पाठवला.

हॉटेलवाल्यांनाहि तिच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. नेपाळला फेसबुक आणि यूट्यूब बरेच प्रसिद्ध आणि जास्त वापरले जाणारे असल्याने मोफत आहे. सगळ्यांनी रिबर्थ संस्था आणि त्यांचे कार्य पाहून प्रितीचे खूप कौतुक केले. एक निस्वार्थ भावनेने एखादी स्त्री किती मोठे धाडस करू शकते याचे त्यांना खूप नवल वाटले. त्यांनी हि रिबर्थच्या संकेतस्थळाला भेट दिली आणि अवयव दानाचा निश्चय केला.

नेपाळच्या ज्या भागात प्रितीचा प्रवास चालू आहे तेथे शाकाहारी भोजनाची सोय कमी असल्याने प्रिती जे मिळेल ते खाऊन भागवत आहे. बरोबर काही नारळपाण्याची पावडरीची पाकिटे आहेत. पण पाणी संपत आले की पाण्याच्या बाटल्या भरुन घ्याव्या लागतात. जिथे जिथे फळे किंवा शाकाहारी अल्पोपहार मिळत आहे तिथे ती थांबून घेत आहे.

मुकामाच्या हॉटेलवर प्रितीला शाकाहारी पर्याय नव्हते मग तिथल्या स्वयंपाकीण बाईला वेजिटेबल नूडल्स कशा बनवायच्या हे शिकवावे लागले. तिने तिच्याकडच्या सगळ्या भाज्या आयत्या नूडल्स शिजवून त्यात टाकल्या. प्रितीची एकंदरीत कोणत्याही गैरसोयीची काहीही तक्रार नाही. सकाळी ३ च्या सुमाराला तिचा दिवस चालू होतो संध्याकाळी मुक्कामी थांबेपर्यंत आराम नसतो. जेवण आणि पुढच्या दिवसाची तयारी करता करता रात्र होते. रात्री आम्हाला दिवसभराचे वर्णन सांगत असतांना तिला जांभया येत असतात , ती थकलेली आहे हे जाणवत असते पण दुसऱ्याच मिनिटाला पुढच्या दिवसाचे टार्गेट काय हे सांगत असतांना ती परत नव्या उत्साहाने भरुन गेलेली असते. खरचं मोठे काहीतरी मिळवणारी माणसे इतकी साधी असतात का?

ना उन्हातान्हाची पर्वा,

ना भूकतहानेचा त्रास ।

एकटी सायकलवारी करुन

रिबर्थचा झेंडा फडकवेल खास॥

शब्दांकन – कविता पिपाडा

X