मी क़ात “नाळ” टाकली……
१५ ऑक्टोबर २०१९, सकाळची वेळ ६:०० वा., मला कळाले की मी आई होणारं आहे. माझा आनंद गगनात मावेना. जसजसे दिवस जाऊ लागले मला माझ्या जबाबदारीची जाणीव होऊ लागली आणि जे जे एक नवीन आई करते ते सगळं मी पण करू लागले. असेच एक दिवस मला “नाळ स्टोरेज” बद्दल कळाले आणि तिथूनच माजा एक नवीन रिसर्च चालू झाला.
नाळ स्टोअर करण्याचे फायदे आणि तोटे बघताना मला कळाले कि मी “नाळ” DONATE पण करू शकते. तसे बघायला गेले तर माझ्या फॅमिली मध्ये तसा कोणालाच आनुवंशिक आजार नाही. मग मी लाखो पैसे खर्च करून नाळ स्टोअर करण्यापेक्षा मी ती DONATE करून लाखो आशीर्वाद का नको कमवू? आणि अश्याप्रकारे मी आणि माझ नुकतंच जन्मलेलं बाळ DONERS बनलो.
एक बाई जेव्हा गर्भवती होते तेव्हा “नाळ” आईला आणि बाळाला एकत्र जोडण्याचे काम करते. गर्भकाला आवश्यक आणि गरजेचे पोषकद्रव्य पुरवण्याचे काम नाळ करत असते. जेव्हा आई प्रसूत होते तेव्हा हि नाळ (UMBILICAL CORD) आणि अपरा (PLACENTA) याचे रूपांतर कचऱ्यात होते. आता मला सांगा जी गोष्ट अशीही कचऱ्यात फेकली जाणार आहे, ज्या गोष्टीपासून स्वतःला किंवा स्वतःच्या शरीराला काहीच त्रास होणार नाहीये- अशी गोष्ट मग DONATE करून थोडं पुण्य कमावण्यात काय हरकत आहे? काहीच नं करता, खूप काही केल्याचं समाधान हे वेगळंच असतं, ते असा शब्दात नाही सांगता येणार.
आतां, आपण “ नाळ DONATE” करतो म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर या नाळेमध्ये काही रक्त शिल्लक असते आणि आपण ते DONATE करतो. नाळेतील या रक्तामध्ये अश्या क़ाही रक्तपेशी असतात ज्या ८० पेक्षा जास्त आजार आणि विकारांवर ठरू शकतात. या ८० आजारांमध्ये आपण कर्करोग (कॅन्सर), रक्ताचे जीवघातक विकार, अस्थिमज्जाचे विकार, चयापचय आणि रोगप्रतिकारक शी निगडित विकारांची गणना करू शकतो.
आता तुम्ही विचाराल हे कोण कोण आणि कसा करू शकतो? तरं, एक व्यक्ती जी 18 वयापेक्षा जास्त आहे, जिच्या गर्भारपणामध्ये कसलीच अडचण नाही, जी जुळ्या गर्भकाशी गरोदर नाही, जिला गेस्टेशनाल डायबेटिस नाही किंवा दुसरा कोणताच आजार नाही, जिने गर्भारपणाचे 36 आठवडे पूर्ण केले आहेत, आणि जी आई नैसर्गिकरित्या प्रसूत झाली आहे.
भारतामध्ये चेन्नईस्थित “जीवन” नामक संस्था “CORD BLOOD DONATION अँड COLLECTION” साठी कार्यरत आहे. Jeevan.org किंवा BeThecure.in या दोन लिंक वर तुम्हाला जास्तीची माहिती मिळू शकते.नाळेतील रक्ताद्वारे जीवनदान देण्याचे सामर्थ्य एका स्त्रीला-एका आईला मिळालाय,स्त्रीशक्ती साठी हा एक मानाचा तुरा चं नाही का?
माझी गोष्ट सांगायला मला इतका छान प्लॅटफॉर्म मिळाला याबद्दल मी Rebirth Organization ची शतशः आभारी आहे.
– कोमल गुजर