मृत्यू नव्हे हा तर पुनर्जन्म

नुकतीच एक छोटी फिल्म बघितली. त्यातल्या आजोबांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला असतो. ‘आता काही सांगता येत नाही’ अशी परिस्थिती. अखेरच्या दिवसांत घरी भगवद्गीता वाचायला एका गुरुजींना बोलावलं जातं. 

गुरुजी येतात. गीता वाचन सुरू होतं. ते सांगत असतात, “श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की आत्मा अमर आहे आणि मनुष्याचं शरीर नश्वर आहे.” मृत्यूशय्येवर असणारे आजोबाचं हसतात. आणि म्हणतात, “अरे, हे तर जुनं झालं. मला तर अजून डर्टी पिक्चर पार्ट 2 बघायचा आहे.” हे ऐकल्यावर गुरुजी विचारतात, “हे कसं काय?” आजोबा सांगतात, “अरे, मी नेत्रदान करणार आहे. एवढंच नाही तर मी लिव्हर, किडनीसुद्धा दान करणार आहे.” हे सगळं ऐकून गुरुजी म्हणतात, “हे सगळं कशासाठी?” 

आजोबांचं यावरच उत्तर अगदी मार्मिक आहे. ते गुरुजींच्या घड्याळाकडे बघून विचारतात, “हे जुनं घड्याळ तुम्ही का घातलं आहे?” गुरुजी सांगतात, “हे माझ्या वडलांचं आहे आणि चांगलं चालतंय अजून.” हा मुद्दा पकडूनच आजोबा म्हणतात, “अरे, घड्याळ जुनं असूनही चालतं आहे. तसंच माझी लिव्हर, डोळे अजूनही उत्तम आहेत. मग ते का फेकायचे?” ते पुढं म्हणतात, हा स्वार्थच आहे की, जिवंतपणी कुणाला काही द्यायचं नाही आणि मृत्यूनंतरही अवयवदान करायचं नाही. म्हणजे मरणानंतरही कंजूषी करायची. 

मी मरणानंतर ईश्वराच्या समोर स्वार्थी बनून नाही जाणार. हे ऐकून गुरुजींचेही डोळे उघडतात. आणि ते म्हणतात, “आजोबा, मानलं तुम्हांला. आत्मा तर अमर आहेच. पण तुम्ही तर शरीरही अमर केलंत.” ‘एक नवी सुरुवात’ या छोट्याशा, अगदी पाच मिनिटांच्या फिल्ममधली ही गोष्ट. एरवी कुणी सांगून, समजावून सांगितली तरी समजणार नाही कदाचित. पण या पाच मिनिटांत ही फिल्म आपल्याला अवयवदानाविषयी जागरूक करून जाते.

भारतातील अवयवदानाची परिस्थिती

वेळेत अवयव अवयवरोपण न झाल्यामुळे दरवर्षी देशात सुमारे 5 लाख मृत्यू होतात. केवळ 0.01 टक्केच लोक अवयवदान करतात. 2013 ते 18 च्या आकडेवारीनुसार भारतात 49 हजार 155 अवयव रोपणं झाली. त्यात 39 हजार लाईव्ह डोनर होते. तर 10हजार 155 मृत डोनर होते. किडनी, लिव्हर, हृदय, फुफ्फुस, पॅनक्रियाज आणि छोटं आतडं अशी प्रत्यारोपणं या काळात झाली. 2018 च्या आकडेवारीनुसार अवयव प्रत्यारोपण करण्यात भारताचा जगात दुसरा नंबर होता. (Ref – https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/32758118/)

आज भारतात Live Donor चे प्रमाण अधिक आहे. तर, परदेशात मृत्यूनंतर अवयवदानाचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी एक घटना सांगाविशी वाटते. निकोलस हा 7 ते 8 वर्षांचा अमेरिकन मुलगा. तो, त्याचे आई-वडील सुट्टीत इटलीमध्ये फिरायला जातात. बीचवर फिरताना निकोलसला कुठूनतरी बंदुकीची गोळी लागते. लगोलग दवाखान्यात नेलं जातं. पण डॉक्टर त्याला ब्रेन डेड घोषित करतात. त्याचे आई-वडील इटलीमध्येच त्याचे अवयवदान करतात. या घटनेने इटलीतील लोक प्रेरित झाले. आणि त्यामुळेच आज इटलीमध्ये फक्त cadover organ donation म्हणजेच मृत्यूनंतरचे अवयवदान होते. Live Donor ची गरजच तिथं भासत नाही. म्हणूनच याला निकोलस ग्रीन इफेक्ट म्हटलं जातं.

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ऑर्गन डोनेशनसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या रसिका कुलकर्णी सांगत होत्या, की ऑर्गन डोनेशन हे मृत्यूनंतर होत नाही. जेव्हा पेशंट ब्रेन डेड असतो म्हणजेच एखाद्या अपघातात रुग्णाच्या मेंदूला मार बसतो, इंटर्नल रक्तस्त्राव होतो आणि पेशंटच्या छोट्या मेंदूला मार बसतो. अशावेळी पेशंटला थेट आयसीयूमध्ये दाखल केलं जातं. असा पेशंटही थेट ब्रेन डेड आहे जाहीर केलं जात नाही. तर डॉक्टरांची एक टीम असते. त्यात न्यूरॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, फिजिशियन अशी टीम मिळून त्या पेशंटच्या काही तपासण्या करते. त्याला ऑप्निया टेस्ट असं म्हटलं जातं. सहा तासांच्या अंतराने या तपासण्या केल्या जातात. त्यानंतर पेशंट मेंदू मृत जाहीर केला जातो. अशा रुग्णात काय होतं की, मेंदूला मार लागल्यामुळे पेशंटची परिस्थिती कोमासदृश झालेली असते. पण कोमामध्ये पेशंट बरा होण्याची म्हणजे कोमातून बाहेर येण्याची शक्यता असते. त्यासाठी एक मिनिटापासून एक तास, एक वर्ष, दहा वर्ष असा कितीही काळ लागू शकतो. पण तो परतण्याची शक्यता असते. तसंच त्याला रिफ्लेक्स असतात. म्हणजे त्याला चिमटा काढला, डोळ्यावर प्रखर प्रकाश सोडला तर तो रुग्ण त्याला प्रतिसाद देतो. पण ब्रेड डेड पेशंटकडून असा  कुठलाही प्रतिसाद नसतो. तो कुठल्याही परिस्थितीत परत येत नाही. तो व्हेंटिलेटरवर असतो. त्यामुळे त्याच्या अवयवांना ऑक्सीजनचा पुरवठा होत असतो. त्यामुळे त्याचे अवयव जिवंत असतात म्हणून त्याचे अवयव दान करता येतात. 

अवयवदानात काही प्रकार आहेत. यात – 

जिवंतपणी –

1 किडनी

2 यकृताचा काही भाग

3 आतड्याचा काही भाग

4 त्वचेचा काही भाग

5 Bone Marrow

याचे दान करू शकतो.

मृत्यूनंतर – 

काही तासांच्या आत नेत्रदान, त्वचा दान होऊ शकतं. 

तर ब्रेन डेड रुग्णात – 

हृदय, फुफ्फुसे, यकृत, किडनी, स्वादुपिंड, नेत्र, त्वचा, आतड्याचा काही भाग इ. अवयवांचे दान करता येतं. ब्रेन डेड किंवा मृत्यूनंतर अवयव दानासाठी इच्छा असणाऱ्यांसाठी वयाची कुठलीही अट नाही. स्त्री, पुरुष कोणीही करू शकतो. अवयव दानाची कोठेही घोषणा करण्याची गरज नाही. फक्त आपल्या नातेवाईकांना सांगणे महत्त्वाचे. तसेच ब्रेन डेडमध्ये रुग्ण अशा अवस्थेत असतो की, तो संमतीपत्र देऊ शकत नसतो. म्हणूनच जिवंतपणीच अशी अवयवदानाची इच्छा form भरून तो zdcc म्हणजेच Pune’s Zonal Transplant Coordination Committee ला द्यावा. किंवा विविध सामाजिक संघटनांमध्ये नोंदवू शकतो. 

अवयवदान ते योग्य व्यक्तीस अवयवरोपण यासाठी वैद्यकीय टीम चोवीस तास आणि सातही दिवस काम करतच असते. परंतु, हा अवयवदानातील अवयव लवकर योग्य त्या ठिकाणी पोहचण्यासाठी Green Corridor ची खूप मदत होत असते. यात पोलिसांचा सहभाग निश्चितच प्रशंसेस पात्र आहे. तरीही यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असणे अतिशय महत्त्वाचे आहे. 

अवयवदान ते अवयव रोपण या सर्व प्रक्रियेत डॉक्टर, विविध वैद्यकीय टीम्स, Green Corridor मध्ये पोलीस हे सर्व काम करतच असतात. परंतू अवयवदान करणारी व्यक्ती व त्यांचं त्यावेळी निर्णय घेणारं कुटुंब खूपच महत्त्वाचे असतं. हेच खरं Real Hero आहेत. 

– वर्षा आठवले

X