निर्णयाच्या अल्याड पल्याड
16 जुलै 2018…. सकाळी साडेसहाची वेळ. हॉस्पिटलमध्ये सिस्टर मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यासाठी आलीय. माझ्याभोवती माझा लेक, भाऊ, मैत्रीण आहेत. साश्रू नयनांनी मला ‘ऑल द बेस्ट’ म्हणत आहेत. ‘पुढे सगळं सुखरूप होऊ दे’ अशी देवाला मनोमन आळवणी सुरू असतानाच माझी रवानगी ऑपरेशन टेबलवर होते. नंतर एकदम संध्याकाळी सात वाजताच हलकीशी कुजबूज कानांवर पडते. पण डोळ्यांवर प्रचंड झापड आणि ग्लानी आहे. नीरजचा, माझ्या लेकाचा आवाज आहे हा. कोणाला तरी सांगतोय तो, ‘दोघांची ऑपरेशन्स चांगली झाली. बाबांना किडनी लगेचच सूट झाली’. हे ऐकून समाधानाने डोळे मिटतात, गाढ झोप लागते.
दुसर्या दिवशी पहाटे जाग येते. आपण कुठे आहोत? आजूबाजूला बघितल्यावर लक्षात येते. हॉस्पिटलमध्ये आहोत, काल आपलं ऑपरेशन झालं. आपण किडनी दिली, मुकुंदच्या डायलिसिसच्या यातना आता संपल्या. विचारांनी मन सुखावतं. अरे, पण हे काय होतंय? असह्य कळ येतीय. आई गं.. ऑपरेशन केलेल्या जागी खूप वेदना होत आहेत. ‘सिस्टर.. खूप दुखतंय हो’.
‘थोडं सहन करा..आता तुम्हाला पेनकीलर्स नाही देता येणार’. घट्ट डोळे मिटत एक दीर्घश्वास घेते.
मिटल्या डोळ्यांपुढे गेल्या एक दीड वर्षातला प्रवास तरळून जातो. मुकुंदची जवळपास दीडशे वेळा झालेली डायलेसिस. डायलेसिसच्या वेळी अधूनमधून होणारे त्रास. त्याला सोसायला कठीण आणि मला बघायला कर्मकठीण. ब्रेन डेड पेशंटची किडनी मिळावी म्हणून लगेचच लावलेला नंबर मागेमागे जातोय. दिवसेंदिवस यातना वाढत जात आहेत.
‘तुम्ही किडनी देण्याचा निर्णय लवकर घ्या मॅडम. त्यांची तब्येत बघता लिस्टमध्ये जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा त्यांना ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झेपेल का नाही सांगता येत नाही’, डॉक्टर सांगतात. दिवसभर मन त्याच विचारात गुंततं.
खरंतर आपणच किडनी द्यावी, हा विचार काही आता नव्याने होत नव्हता. किडनी डोनेशनच्या लिस्टमध्ये नावं नोंदवलं तेव्हाही माझ्या डोक्यात हा विचार घोळत होताच. पण एकाच घरातल्या दोघांनीही जीव धोक्यात टाकायचा ही मोठी जोखीम होती. आम्हाला दोघांनाही काही झालं असतं तर काय, हा विचार मनात आल्याशिवाय राहत नव्हता. आता डॉक्टरांनी तसं सुचवून त्यावर शिक्कामोर्तबच केलं. डॉक्टरांचे शब्द मनात वारंवार घोळायला लागले आणि एका क्षणी माझा निर्णय पक्का झाला. मी किडनी डोनेट करणार आणि मुकुंदची या यातनांमधून सुटका करणार.. आता बास!
अर्थात निर्णय पक्का झाला एका क्षणी, पण त्याआधी असंख्य विचार डोक्यात येऊन गेले. साधं भाजी चिरताना बोट कापलं तरी त्याची ठसठस दिवसभर जाणवत रहाते. इथे एक महत्त्वाचा अवयव द्यायचा होता, त्यासाठी पोटाची बर्यापैकी चिरफाड करून घ्यायची होती. ती जखम बरी होण्यासाठी बराच वेळ द्यावा लागणार होता, त्यासाठी काही काळ सक्तीची विश्रांती आवश्यक होती. शिवाय सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पुढचं आयुष्य एका किडनीवर काढायचं होतं. आतापर्यंत ठणठणीत असलेल्या प्रकृतीचं काही प्रमाणात का होईना नुकसान होणार होतं. एक शंकेखोर मन असे प्रश्न सतत उपस्थित करत होतं, तर दुसरं मन काहीही असो हे करायचंय असं बजावत पहिल्या मनाला गप्प करत होतं. शंकेखोर मनाचा एक प्रश्न मात्र पुन्हापुन्हा डोकं वर काढत होता, हे सगळं सहन करूनही जर ती किडनी मुकुंदच्या शरीराने स्वीकारलीच नाही तर? पुन्हा डायलेसिस करावं लागलं तर? त्याला साथ द्यायला ऑपरेशननंतर तू सक्षम असशील का? आणि या प्रश्नांना मात्र समाधानकारक उत्तरं नव्हती. एका परिचितांनी त्यांच्या बघण्यात असलेलं असं एक उदाहरण सांगितलं होतं. असंच काही आपल्याही बाबतीत झालं तर? दुसर्या मनाने लगेच उत्तर दिलं, ‘तू तुला शक्य ते सारे प्रयत्न केलेस. बाकी भरवसा नशीबावर. माझ्याकडून प्रयत्नात कोणतीही कसूर झाली नाही हा दिलासा तरी मिळेल.’ शंकेखोर मनाला ‘चिडीचूप रहा’, असं ठणकावून सांगितलं आणि नियतीचं हे आव्हान स्वीकारायला मी मनाने सज्ज झाले.
डॉक्टरांना माझा निर्णय सांगितला. त्यांनी तपासण्यांची एक भली मोठी यादी माझ्या हातात ठेवली. त्या सगळ्यांचे रिपोर्ट्स उत्तम आले. पण तेवढ्याने भागणार नव्हतं. अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करणं आवश्यक होतं, जे प्रचंड वेळखाऊ आणि संयमाची परीक्षा बघणारं होतं. असंख्य कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी वकील, कोर्ट, पोलीस स्टेशन, सरकारी ऑफिसेस यांच्या किती चकरा झाल्या त्याला गिनतीच नाही. पुन्हा हे सगळं मुकुंदच्या डायलेसिसचे दिवस आणि वेळा सांभाळून. शारीरिक, आर्थिक आणि मानसिक पातळीवर चालू असलेलं हे युद्ध अखेर 16 जुलै 2018 या दिवशी संपलं. त्या दिवसापासून आजपर्यंत मुकुंदची क्रिअॅटिनीन लेवल 0.6 च्या पुढे गेलेलं नाही.
अशी ऑपरेशन्स यशस्वी होणं हे एक टीमवर्क आहे. सगळ्यात मोलाचा वाटा आहे तो वैद्यकशास्त्राचा. डॉक्टरांची टीम अक्षरश: देवदुताप्रमाणे जीवनदानाचं काम अव्याहत करत असते. या सगळ्या काळात पेशंटच्या आणि डोनरच्या पाठीशी उभे राहणारे नातेवाईक, हितचिंतक, मित्रमैत्रीणी यांची साथ या काळात खचून देत नाही. आत्मबळ वाढवते. अवयवदानाचा निर्णय करणं सोपं नव्हतं. तो निर्णय प्रत्यक्षात येण्यात अनेकांचं योगदान आहे आणि त्याबद्दल कृतज्ञतेची भावना आजन्म माझ्या मनात असेल. आज माझ्या दोन्ही किडन्या आपापल्या ठिकाणी विनातक्रार, बिनबोभाट, व्यवस्थित काम करत आहेत आणि याचं मला अपार समाधान आहे.
– वृशाली जोगळेकर