प्रितीच्या नव्या साहसाची सुरवात – क्रॉस कंट्री सोलो सायकलिंग भूतान ते भारत

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलहि,

पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते

कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही।

अवघ्या दहा महिन्यात पाचवा विश्वविक्रम करण्यास आपली सायकलपटू प्रिती म्हसके सज्ज – जाणून घेऊया तिचा आतापर्यंतचा प्रवास

प्रिती म्हसके हे नाव पुणेकरांना आता नवे नाही आणि देशभरातील सायकलपटूनाही. सेहेचाळीस वर्षाची स्त्री, दोन मुलांची आई असून एखादया नवतरुणीला लाजवेल इतकी फिट आणि उत्साही आहे.

या पुर्वी लेह ते मनाली सायकलिंग, लेह ते मनाली रनिंग, भारताचे पूर्वेचे टोक ते पश्चिमेचे टोक, नुकतेच यशस्वीरित्या पुर्ण केलेले काश्मीर ते कन्याकुमारी अश्या अवघड मोहिमा तिने सर केल्या आहेत.

या देशांतर्गत मोहिमांनंतर तिने भारताबाहेर ही तिच्या उद्देश्य पोहोचवण्याचे ठरवले आहे. तिच्या मोहिमेचे दोन उदेश्य एक स्वतःचा वेगळाच विश्वविक्रम करणे आणि दुसरा आणि महत्त्वाचा उदेश्य अवयव दानाचा प्रचार आणि प्रसार करणे। या मोहिमेचे वेगळेपण आहे नो सपोर्ट सायकलिंग म्हणजे विना मदतीची सायकल फेरी.

ह्या मोहिमेत सपोर्ट गाडी न नेण्याचे कारण प्रितीला काहीतरी आव्हनात्मक करायचे होते. सोलो सायकलिंग करतांना तिला बरीच आव्हाने पेलावी लागतील

  • कमीत कमी सामान नेणे
  • कुठे स्टॉप घ्यायचा हे स्वतः ठरवणे
  • स्वतःच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सोय स्वतः करणे
  • ग्रुप एनर्जी नसेल, स्वतः स्वतःला प्रोत्साहन देत राहणे
  • सायकल स्वतः मेन्टेन करणे (देखभाल करणे), दुरुस्तीची गरज पडल्यास स्वतःच मॅकेनिक शोधणे
  • भर उन्हाळ्यात सायकल चालवणे
  • स्वतः कड स्वतः लक्ष देणे, प्रकृतीची काळजी स्वतः घेणे
  • ब्लॉगर्सना स्वतः सगळी माहिती आणि फोटोज देणे

प्रितीच्या मोहिमेची सुरवात भूतानहून होणार आहे. काही दिवस अगोदर ती भूतानला पोहोचली जेणेकरुन शरीर तेथील वातावरण आणि तापमानाशी जुळवून घेऊ शकेल. भूतानला गाइड घेतल्याशिवाय चेकपोस्ट पार करण्याची परवानगी नाही. प्रत्येक वेळी महत्त्वाच्या ठिकाणी गाइड असल्याशिवाय पुढे जाऊ देत नाही. पहिल्या दिवशी इमिग्रेशन, इन्शुरन्स या आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात गेल्या. स्थानिक पर्यटनाचा आनंद घेतांनाच तिथले काही प्रमुख पास हि प्रितीने सायकलने आणि गिर्यारोहण करुन पार केले.

पारो शहारात राहून ३८ किमी चेलेला पास सायकलवर पार केला जो समुद्रसपाटीपासून ३२००-३५०० किमी उंचीवर आहे. १० किमीचे गिर्यारोहण करुन टायगर नेस्ट ह्या प्रसिद्ध मठापर्यंत जाऊन आली. पारोजवळ असलेली स्थानिक बाजारपेठ, प्राचीन किल्ला पाहिला. दोचुला पास,पुनाखा व्हॅली अशी भूतानची प्रेक्षणीय स्थळे बघता बघता, रोजचा व्यायाम करत करत: तीन चार दिवसात वातावरणाशी जुळवून घेत प्रिती आणखी एका नव्या साहसाला सज्ज झाली आहे.

प्रितीची मोहीम थिम्पूहून सुरु होणार आहे म्हणून ती आदल्या दिवशी दुपारीच तेथे पोहोचली आणि तिचा सायकलिंगचा वेश पाहून देशी विदेशी पर्यटकांच लक्ष वेधले गेले. या संधीचा फायदा घेत तीने आपल्या अवयव दान आणि रिबर्थ बद्दल सगळयांना माहिती दिली. न्यूझीलंड, स्विट्झरलँड आणि अनेक देशांच्या नागरिकांवर प्रितीची छाप नसती पडली तर नवलच! सगळयांनी तिच्याबरोबर फोटोज हि काढले. आपल्याकडील वीणा वर्ल्डतर्फे आलेले पर्यटकांनीही तिच्या मोहिमेची माहिती घेतली आणि तिला भरघोस शुभेच्छा दिल्या.    

उद्या २३ एप्रिलला सकाळी पाच वाजेच्या सुमाराला या मोहिमेचा फ्लॅग ऑफ भूतान येथील थिम्पूहून  होईल आणि आपण आणखी एका अचाट विक्रमाचे साक्षीदार होऊ.

नवा दिवस,नवी ओढ,

अवयव दानासाठी नवे रेकॉर्ड।

करेल पार देशाची बाउंड्री,

प्रितीचे नवे साहस सायकलिंग क्रॉस कंट्री !!

शब्दांकन – कविता पिपाडा

X