RED Signal Turning GREEN
एखाद्या कामासाठी आपण स्वतःला झोकून द्यावं आणि त्याचे चांगले परिणाम ‘याची देही याची डोळा‘ पहावयास मिळावे हे केवढं भाग्य!
आज सकाळपासूनच काकांची लगबग चालू होती. आज बेंगलोर च्या अपोलो हॉस्पिटलमध्ये काकांचा कार्यक्रम ठरला होता. हॉटेलपासून हॉस्पिटल थोडं लांब असल्याने आणि बेंगलोर च्या traffic चा अनुभव आदल्या दिवशीच घेतल्याने, काकांनी लवकरच सलीमला हॉटेलवर येण्याची विनंती केली होती.
सलीम ९ च्या दरम्यान आला आणि काका लगेच अपोलो हॉस्पिटलच्या दिशेने निघाले.
काकांच्या गाडीचं वेगळेपण, ReBirth आणि Organ Donation विषयीचे slogans आणि माहिती हे सर्व लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
काका signal ला थांबले कि लोक आवर्जून विचारणा करीत होते. काकाही signal चा लाल दिवा हिरवा होईपर्यंत मिळालेल्या ५–७ सेकंदात जमेल तेवढी माहिती, उत्तरे देत होते.
कदाचीत ही माहिती मिळालेली एखादी व्यक्ती पुढे जाऊन अवयव दानाचा निर्णय घेइलही आणि अवयवाच्या प्रतिक्षेत Red signal मध्ये थांबलेल्या गरजू रुग्णासाठी Green signal देऊन जाईल ही!
कोणास ठाऊक!
काका या विचारात रेंगाळत असतानाच सिग्नल सुटला आणि काकांची विचारांची शृंखलाही!
सलीम मात्र काकांच्या एक सिग्नल पुढे गेला होता आणि काकांची वाट पाहत थांबला होता.
काका आणि सलीम अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
काका येणार हे माहित असल्याने काही स्टाफ मेंबर्स काकांच्या स्वागतासाठी थांबले होते.
काका तिथे पोहोचले तेव्हा तिथे कसलीतरी लगबग सुरू होती. काकांना आणि सलीमला एका रूम मध्ये थांबण्याची विनंती करून स्टाफ मेंबर्स लगेचच त्यांच्या कामाला निघाले.
काकांना भाषा जरी समजत नव्हती तरी काहीतरी emergency आहे हे कळत होतं.
काकांनी पुढे जाऊन विचारणा केली आणि काका एकदम भारावून गेले.
काही वेळापूर्वी एक व्यक्ती brain dead झाली होती, त्याच्या नातेवाईकांनी अवयव दानासाठी सहमती दिली होती. अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांचं एक पथक म्हैसूर च्या अपोलो हॉस्पिटलमध्ये तातडीने निघालं होतं. Organ transplant म्हैसूर च्या हॉस्पिटलमध्ये होणार होतं.
एक मेंदूमृत व्यक्ती मरणाच्या उंबरठ्यावरून ८ व्यक्तींसाठी जीवनदानाचा आहेर देऊन जाणार होती.
हे ऐकून काकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ज्या कामासाठी जीवाचं रान करून आपण ReBirth च्या माध्यमातून भारतभर प्रवास करतो आहोत, त्या कामाचं आज डोळ्यासमोर सोनं होताना पाहताना काकांना धन्य धन्य वाटलं!
अपोलोचे डॉक्टर आणि staff एवढ्या गडबडीतही काकांना पाच मिनिटे भेटून गेले . पुस्तक, फळे आणि खूप साऱ्या शुभेच्छा देऊन हे पथक म्हैसूर कडे तातडीने रवाना झाले.
काका निशब्द होते. अवयवदानाच्या प्रचाराच्या कामात झोकून देऊन काम करणाऱ्या काकांसारख्या ReBirth च्या अनेक कार्यकर्त्यांसाठी ही खूप रोमांचकारी घटना होती!
काका आणि सलीम अपोलो मधून निघाले. सलीमने काकांना हॉटेल वरती सोडले आणि तो त्याच्या कामाला निघून गेला.
‘ती‘ Brain dead व्यक्ती, जिचे आज अवयव दान होणार होते, तीही इतक्याच सहजपणे जाता जाता मागील ८ लोकांना आश्वासक जगण्याचे दान देऊन निघून गेली असणार!
त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सहमती (consent) देऊन ‘RED Signal’ खऱ्या अर्थाने ‘GREEN’ केला!
Day 25
Bengaluru, Karnataka
अस्मिता फडके–ताटके
Add Comment