RIDE and SHINE (Marathi)
उत्तुंग ध्येयाकडे नेणारी उंच झेप!
सलग चौथ्या दिवशीहि प्रितीचा उत्साह कायम – मध्यप्रदेशाहून महाराष्ट्राकडे कूच
एकूणप्रवास – ३००कि.मी.
सायकल वरील एकूण वेळ – जवळजवळ २० तास
आतापर्यंतचाएकूणप्रवास – १५००कि. मी.
रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – मथुरा, आग्रा,चंबळ घाट, ग्वाल्हेर, मुरैना, झाँसी, ललितपूर
आतापर्यंत पार केलेली राज्ये – जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश
प्रिती तिसऱ्या दिवशी सकाळी ढोलपूर, राजस्थानहून निघून मध्यप्रदेशात दाखल झाली. रस्त्यात चंबळ नदी आणि चंबळ घाट लागले. ती ग्वाल्हेर येथे दुपारी ३ वाजता जेवणासाठी थांबली. आता पुढचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ४४ चालू आहे. प्रिती दोन दिवस सलग सायकल चालवूनही विश्रांती/ झोप घेण्यास तयार नव्हती. दिवसभरात दोनेकदा थांबून छोटी विश्रांती घेतली. रात्री उशिरा तिने चारेक तास झोप घेतली आणि पुढे जाण्यास सज्ज झाली. आज सोळा तारखेला सकाळी ती ललितपुर येथुन निघून सागर येथे पोहचण्याचा तिचा मानस आहे.
कित्येक जणांना हे एक वेडे धाडस वाटत आहे, काहींना अविश्वसनीय! पण प्रिती आणि प्रितीला ओळखणाऱ्यांना अत्यंत खात्री आहे की हि मोहीम अवघड आहे पण शक्य आहे.
प्रिती कुठून आणते हि हिंमत आणि असा दृढनिश्चय ?
ते काय आहे की ज्याच्यामुळे तिला पुढे पुढे जाण्याची उर्जा मिळते?
ती नक्की योग्य ते खात पीत आहे का?
तिची काळजी घेतली जात आहे का ?
कदाचित अती परिश्रमाने ती मोहीम तडीस नेण्यास अडचणी आल्या तर?
तिच्या मनात काय चालल आहे?
असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात येत आहेत आणि यांची उत्तरे दिली टिमचे सदस्य आनंद आणि प्रितीची मुलगी ऋतुजा हिने
प्रिती दिवसभरात आठ ते दहा हजार उष्मांक(कॅलरिज) खर्च करत आहे. आणि शरीराची हि झीज भरुन काढण्यासाठी ती चांगल्या प्रमाणात प्रथिने (protein) घेत आहे. शाकाहारी असल्याने तिचा भर कडधान्ये, पनीर, डाळ, प्रोटीन बार्स यांच्यावर आहे. दिवसातून ती साधारण ६-७ वेळा थोडे थोडे खात असते तेही सायकल चालवत असतांना… पण जेवण मात्र थांबून घेते. जेवतांना ती एकच पथ्य पाळते ते म्हणजे वाजवीपेक्षा जास्त खात नाही.भरपेट खाल्याने कदाचित तिला सुस्ती येईल किंवा झोप लागेल.
प्रिती दिवसभरात ३-४ लिटर पाणी घेत आहे जे सुरुवातीला थंडी असल्याने थोडे कमी होते. वेळोवेळी नारळ पाणी, ताक आणि उत्साहवर्धक पेये घेत असते. पौष्टिक आणि सहज खाता येणारे पदार्थ याच्यावर तिचा विशेष भर आहे. जेव्हा जेव्हा ती विश्रांतीसाठी थांबते, आवश्यक ते व्यायाम (stretching – स्ट्रेचिंग) करायला विसरत नाही. कडाक्याच्या थंडीतून ती आता उष्ण प्रदेशात आली आहे. उष्ण वातावरणाचा त्रास होऊ नये म्हणून एक खास जाकीट ती ओले करुन घालत आहे. शक्यतो पुढचा प्रवास जास्तीत जस्त ऊन्हाच्या वेळा टाळण्याचे तिचे नियोजन आहे.
तिच्या मनात हि मोहीम वेळेत कशी पूर्ण करता येईल हा हिशोब चाललेला असतो. आपण हातात घेतलेले अवयव दान प्रसाराचे काम हे आपल्या वैयक्तिक गरज आणि त्रासपेक्षा किती मोठे आहे ह्याची तिला सदोदित जाणीव आहे.
या सगळ्यात टीमची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, वेळोवेळी तिला पाण्याची आठवण करुन देणे, तिच्यासाठी जवळचे स्वछतागृह शोधून ठेवणे, तिच्यासाठी पाण्याची बाटली भरुन ठेवणे, तिच्या खाण्याचे जिन्नस हाताशी ठेवणे व वेळोवेळी तिला पुढे जाऊन थांबून तिच्या हातात देणे जेणेकरुन ती सायकल चालवत असतांनाच एका हाताने बाटली/ खाऊ घेईल. तिचा थांबण्यात एकही मिनिट वाया जाणार नाही.
टिमचे रस्त्यात तिच्या निर्धारित मार्गाचे लक्ष ठेवणे, तिच्या सायकलीच्या वेगाचे भान ठेवणे, रहदारीचे रस्ते( शहरातील) टाळणे हे काम मोबाईल फ़ोनच्या माध्यमाने सतत चालूच असते. याव्यतिरिक्त जेव्हा जेव्हा तिला भावनिक आधाराची गरज असेल तेव्हा तिला प्रोत्साहन देणे. रात्री ती पुर्ण वेळ जागी आहे याची खात्री करत रहाणे, तिला कुटुंबियांशी आणि जवळच्या मित्रपरिवारशी संपर्क साधून देणे हेही तितकेच महत्वाचे आहे.
तिची कन्या ऋतुजा प्रत्येक विश्रांतीत तिला मसाज देणे, आवश्यक त्या विटामिनच्या गोळ्या देणे आणि तिचा उत्साह वाढवत रहाणे हि महत्त्वाची जवाबदारी पार पाडत आहे. या मोहिमेत त्या दोघींनी आपली आपली भूमिका बदलली आहे, ऋतुजा आईची भूमिका बजावत आहे.
प्रितीच्या या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी आपण खालील लिंक दाबून तिचे अचूक ठिकाण, सायकलीचा वेग आणि पार केलेले अंतर बघता येईल.
http://tracknow.me:8082/modern/?token=eaqjb6wm034bq4iye5bhde8jo0sx9w
प्रितीला खालील सामाजिक प्रसार माध्यमावर (social media) शुभेच्छा पाठवू शकता.
Instagram – the_extream_lady
WhatsApp- https://chat.whatsapp.com/FxA3LHyMGJnAwV7xw1PRXA
ना थके कभी कदम
ना कभी हिंमत हारी
कितनी भी मुश्किले आये तू रखे सफर जारी
परिवर्तन लाये लाखो जिंदगियोमे
लोग करे अंगदान से जीवनदान की तयारी
सफल हो जायेगी
तेरी यात्रा काश्मीर से कन्याकुमारी
शब्दांकन – कविता पिपाडा