चालला तो पोहचला
थांबला तो संपला।।

एकूण प्रवास – १२२ किमी

सायकलवरील अंदाजे वेळ – १५ तास

रस्त्यावरील प्रत्यक्ष प्रवास – १२ किमी ( न विश्रांती घेता)

महत्त्वाची ठिकाणे –  भिमेश्वर,धुमजा, काशीखंड, बार्डिबास रोड

सकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी प्रितीने प्रवासाला सुरवात केली. आज तिला दोन मोठे घाट पार करायचे होते. पहिला घाट जरा लहान होता आणि दुसरा मोठा आणि अवघड!

प्रितीचे लक्ष्य (टार्गेट) काठमांडूच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचणे होते. आणि घाटाच्या रस्त्याची, अवघड वळणांची तिला कल्पना होती.

रस्ता खूपच रमणीय होता. प्रिती म्हणते सगळ्यांनी एकदा तरी या रस्त्यावर प्रवास करुन निसर्गाचा आनंद लुटावा. रस्ता अत्यंत मनोहर असला तरी तितकाच कस पाहणारा होता. सबंध रस्ता खूप चढ उताराने भरला होता. एकदम  दम लागेल इतका उंच आणि अचानक खूप उतार होता. प्रितीने अनुमान लावले होते त्यापेक्षा रस्ता अवघड होता. छायाचित्रातल्या घड्याळावरून कमाल वेग ४३ किमी प्रती तास आणि किमान वेग ८ किमी प्रति तास यावरुन या रस्त्याच्या चढ उताराची कल्पना यावी.

प्रिती आपल्या निश्चयावर दृढ असल्याने तिने दिवसभरात अजिबात विश्रांती घेतली   नाही. रस्त्यावर वाहनांची सतत ये जा चालू होती. त्यामुळे सायकल चालवायला कंटाळा आला नाही.

पहिला घाट संपल्यानंतर रस्त्यात अचानक प्रितीला आरसेच आरसे दिसायला लागले. साधारण दोनेक किलोमीटर घाटाची भिंत आरश्यांनी भरलेली होती. घाटात दुकानंमध्ये हि आरसे विकायला होते. प्रितीने तपास केल्यानंतर तिला कळाले की लोकांची अशी श्रद्धा आहे की तिथे आरसा लावला तर मनोकामना पूर्ण होते. आपल्याकडे जसे अनेक ठिकाणी नवसाच्या घंट्या बांधतात तसे काहीसे होते. काही लोक म्हणून घाटातल्या सेती देवी माताला नवस म्हणून देखील आरसा लावतात.

आजचा रस्ता डोंगर दऱ्याने नटलेला होता. जपानने दरी खोदून हा रस्ता बनवलेला आहे आणि तो अतिशय चांगला आहे. पुढचा घाट हि पार पडला पण रस्त्यात प्रिती स्थानिक लोकांना जेव्हा तिच्या अवयव दानाच्या प्रसार मोहिमेविषयी आणि रिबर्थ विषयी सांगत होती तेव्हा लोकांना धक्काच बसला. इतके वेडे धाडस करण्याऱ्या प्रितीबद्दल त्यांना खूप आत्मीयता वाटली. सगळ्यांनी तिला सल्ला दिला कि तिने अंधाराच्या वेळी भगतपुर येथे सायकल चालवून जाऊ नये आणि ती संध्याकाळी आठच्या सुमाराला धुलीखेल येथे मुक्कामासाठी थांबली.

आजचा दिवस प्रितीसाठी खूप समाधानकारक ठरला कारण तिने जे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवले होते ते पूर्ण करू शकली.

आता काठमांडू मात्र १८ किमी राहिले आहे. उद्या काठमाण्डूतील प्रमुख ठिकाणंना भेट देऊन अवयव दानाविषयी जनजागृती करण्याचा तिचा मानस आहे.

रुकेगी नही गर थकी भी है,

इरादा पक्का, हौसला बुलंद है

क्योंकी अभी तो मंजील दूर है

अभी तो मंजील दूर है॥

शब्दांकन – कविता पिपाडा

X