*स्वर्गातील कवी संमेलन*

पूर्वी चित्रगुप्त आपली पोतडी उघडी करून बसायचा. लेजर मध्ये तो प्रत्येकाची balance sheet बघायचा. डेबिट साइडला पाप आणि क्रेडिट साइडला पुण्य. Tally जमली की ठरायचे, स्वर्ग का नरक?  क्रेडिट साइड प्लस असेल तर स्वर्ग नाहीतर नरक.

अलीकडेच त्याच्याकडे स्मार्ट फोन आला आहे.  4G network आले आहे.  …त्यामुळे वायफाय चालू ठेवून गुगल शीट वर त्याचा online हिशोब चालू असतो. रिअल टाइम डाटा एका क्लिक वर उपलब्ध असतो.. डाटा अनंत वेगाने असल्याने काम फार स्पीड ने होत आहे. त्यामुळे त्याला आज-काल थोडी उसंत मिळू लागली आहे.


त्या वेळेचा सदुपयोग म्हणून तो आणि यमराज हल्ली काही events arrange करत असतात.. मग कधी थोर गायकांच्या मैफिली, कधी चित्रकारांच्या कलेचा आस्वाद, तर कधी थोर देशभक्तांना वंदन अश्या इव्हेंट त्याने नुकत्याच आयोजित केल्या. काल २७ नोव्हेंबर, अवयव दान दिन .त्याचाच भाग म्हणून त्याने स्वर्गामध्ये काल कवी संमेलन भरवले होते. नेहमी हिशोबा मध्ये गुंतलेला हा माणूस यमराजच्या सोबतीने काही क्षण अवयव दान या विषयावरील कवितेमध्ये घालवत होता.


पहिला कवी आला कविता सादर करण्यासाठी. हा होता एक थोर माणूस, आपले नेत्र दान करण्याचे व्रत घेतलेला .


दान


तसं परत ते सांगायची
गरजच नाही म्हणा…


की असेन मी सतत तुझ्याभोवती
अगदी क्रूर्-अगडबंब
राक्षसासारख्या अंधारात
वा लख्ख आनंदी सूर्यप्रकाशात!


वचन द्यायचे म्हणले तर;
सोबत करीन मी तुला
अगदी श्वास चालू असेपर्यंत
व त्यां नतरसुद्धा.


त्यामूळेच दान करतोय माझे
दोन्ही डोळे–
जपण्यासाठी तुला नि तुझ्या
डोळ्यातील ओघळणार्‍या अश्रूंना;


अगदी माझे अस्तित्व असताना वा
नसताना देखील_ !


यमराज आणि चित्रगुप्त दोघेही भारावून गेले..  हा नक्कीच स्वर्गात जाण्यास पात्र .फार उदात्त काम केले आहे. आणि मग दुसरा एक कवि समोर आला आपली कविता सादर करण्यासाठी. कवितेचे नाव ‘कविता जगणं’


कविता जगणं


वांझोट्या विचारांचा
ढोल वाजवत..
निघालो आहे..
स्वतःच्या पाठीवर

स्वतःच शाबासकी देत…
उगाचच काढून छाती आपली पुढे
नि

करुन मान ताठ…
‘मी’ने बांधलेल्या… ‘मी’च्याच हमरस्त्यावर.
करतोय उधळण शब्दांची..
जुळवाजुळव करत मात्रांची नि वृत्ताची
नि
जमवू पाहतो आहे
एक कविता..कृतीहीन विचारांची


“——-‘अँव’ करायला पाहिजे नि ‘त्यँव’ करायला पाहिजे……”


नि समोर तो म्हातारा जगतोय साक्षात एक कविता
करीत होता आपल्याच गेलेल्या लेकाचे
अवयव दान
आणि करत होता सही consent form वर
स्वतःच्या हाताने.


यातील महत्त्वाचं काय?
कविता करणं?
की
कविता जगणं??


चित्रगुप्त अगदी  स्तब्ध झाला.. त्याला कौतुक वाटले त्या म्हाताऱ्याचे आणि त्याच्या लेकाचे.. हा कवी म्हणजे साक्षात तो कवितेतील म्हातारा होता.अर्थात याला पण स्वर्गात स्थान मिळाले होते.


मग तिसरी कविता सादर करण्यासाठी आल्या एक कवियत्री त्या अवयव दान या विषयावर जन जागृती करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या .आयुष्य भर त्यांनी अवयव दान प्रचार नी प्रसार याचे काम मनापासून केले. कदाचित पृथ्वी वरील त्या शिवदे काकू असाव्यात त्यांच्या कवितेचे नाव होते ‘अवयव दान’


‘ अवयव दान ‘


वघे सकळजन ऐका देऊन कान
चन देतो मी करीन अवयव दान,
त्न तोचि घडविन कार्य हे महान
ळण जीवनाचे होई जीवनानंतर छान;


दातृत्वाची ही आपली दैवी संस्कृती,
मन करतो तिजला करता हरेक कृती


र जोडून करतो तुम्हा मी विनम्र विनवणी
राख होण्याआधी करा अवयवदानाची बोलणी !


पुढे अजून काही लोकांनी कविता सादर केल्या.


चित्रगुप्त आणि यम दोघेही आज फार भावूक झाले होते.. त्यांना अवयव दान या विषयावर काम करणाऱ्या सर्व लोकांचा अभिमान वाटू लागला होता.


कवी संमेलनाचा कार्यक्रम संपला होता..आणि अश्या रीतीने स्वर्गातील अवयव दान दिन विषयक कार्यक्रम संपन्न झाला

– विवेक ताटके

X