……आणि चित्तथरारक मोहिमेची सुरुवात झाली!

श्रीनगर येथून प्रितीच्या साहसी सायकल यात्रेची सुरुवात – निसर्गाने घेतलेल्या परिक्षेत प्रिती अव्वल!!

एकूण प्रवास – ३४५ कि.मी.

सायकलवरील एकूण वेळ – २० तास

रस्त्यावरील महत्वाची ठिकाणे – उधमपूर, काझीकुंड बोगदा, चेनानी नाश्री बोगदा (जम्मू काश्मीरची जीवनरेखा अर्थात लाइफलाईन)

१०..९..८..७..६..५..४..३..२..१ अंकांची उलटमोजणी झाली आणि लाल चौक, श्रीनगर येथून प्रितीच्या साहसी सायकल सफरीची सुरुवात झाली.

या वेळी फ्लॅग ऑफला एएनजे चे अधिकृत अधिकारी, बाबा फिरदोस (जीएसपीएफपी चे जम्मू मधील प्रतिनिधी)  श्री वसिम मलिक (जे अँड के पर्यटन विकास मंडळ), इएमएस तर्फे श्री मुश्ताक (बी व्ही जी ग्रुप १०८ एम्बुलेंस सेवा), काही पत्रकार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी झटणाऱ्या एनजीओ जीएसपीएफ संस्थेचे चे अध्यक्ष डॉ अनंत भागवत यांचे हि ह्या मोहिमेला सहकार्य लाभले आहे.

आदल्या दिवसापासून चालू असणारा हिमवर्षाव चालूच होता, गार बोचरी थंडी, उणे ६ ते उणे ८ डिग्री तापमान, बारीक पाऊस, खराब रस्ता, हे सगळे काय कमी होते की काय भरीस भर रस्त्यात भरपूर रहदारी (ट्रॅफिक) होती.  या अवघड रस्त्यासाठी प्रितीने एमटीबी (Mountain bicycle) हि डोंगराळ भागासाठी उपयुक्त सायकल चालवली. या संपूर्ण मोहिमेत, प्रितीच्या शारीरीक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारा हा प्रवास होता. पावसामुळे प्रितीचे बूट, हातमोजे ओले झाले, रसत्यावरच्या खड्ड्यामुळे अंगावर उडणारा चिखल, जागोजागी असणारे अडथळे, भूस्खलन (land slide) जणू काही निसर्ग प्रितीच्या धैर्याची परीक्षा घेत होता. प्रितीने तोंड झाकले नव्हते आणि गारव्यामुळे तिची बोटे, नाक बधीर झाले होते. एका ठिकाणी उंचावरुन कोसळणाऱ्या दगडापासून चालक दलाचे सदस्य आनंद डोक्याला गंभीर दुखापत होता होता अगदी थोडक्यात वाचले. हा संपूर्ण प्रसंग प्रिती आणि टिम दोघांची परीक्षा बघणारा होता.पण या संकटाला डगमगेल ती प्रिती कसली.  ती या सगळ्यावर मात करुन पुढे चालत होती आणि टीमला हुरुप देत होती.

प्रितीला रस्त्यात दोन मोठे बोगदे पार करायचे होते एक होता काझीकुंड बोगदा ( हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब बोगदा आहे साधारणपणे ८.४५ कि.मी.) जो चारपदरी रस्ता असल्याने सुरक्षित आहे. या वेळेपर्यंत हिमवर्षाव थांबला होता. प्रिती पुढे, मागे एम्बुलेंस, पायलट कार, चालकदलाची कार हे बघणाऱ्यांचे आकर्षणाचे केंद्र झाले होते.

पुढचा बोगदा चेनानी नाश्री जो डॉ श्यामल प्रसाद मुखर्जी या नावानेही ओळखला जातो आणि पटणीटॉपवरून जातो तो दुपदरी असल्याने तिथे ८-१० कि.मी. वाहतुकीची कोंडी झाली होती आणि जिथे जिथे रहदारी, गाड्यांची गर्दी होती तिथे तिथे चलकदलाचे सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे जम्मू येथील प्रतिनिधी खाली उतरून प्रितीसाठी रस्ता मोकळा करत होते (Safe Passage). जर येथे सगळ्यांचे सहकार्य लाभले नसते तर प्रितीचा खूप वेळ वाया गेला असता आणि ती जवळजवळ ४-५ तास तिच्या पोहोचण्याच्या निर्धारित वेळेपासून मागे राहिली असती. दोन्ही बोगदे पार करण्यासाठी इएमएस (बीव्हीजी ग्रुप) (१०८ ॲम्ब्युलन्स) यांची खूप मदत झाली. बीव्हीजीचे सीईओ डॉ ज्ञानेश्वर शेळके यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

 या दरम्यान सायकलचा चौथा आणि पाचवा गियर सटकत होता, चालकदलाने उधमपूर येथे दुरुस्ती कर्मचारी बोलावून सायकल नीट करुन घेतली तेव्हा प्रितीने छोटी विश्रांती घेतली. विश्रांतीदरम्यान तिने ताणाचे व्यायाम केले आणि जेवण केले. या व्यतिरिक्त कोठेही प्रिती थांबली नाही. सायकल चालवता चालवताच पाणी पित होती आणि एनर्जी बार खात होती.

दुपारनंतर थंडी थोडी कमी झाली, सायकल केशराच्या शेतांजवळून चालली होती, बघता बघता संध्याकाळ आणि रात्र झाली. रात्री रहदारी थोडी कमी झाली पण रस्त्यावर ट्रक दिसू लागले. प्रितीच्या सायकलीचा वेग मंदावला पण तिच्या उत्साहात आणि एकाग्रतेत काही कमतरता आली नाही.

साधारण ३२५ कि.मी. सायकल चालवून प्रिती पठाणकोट येथे पोहोचली. १५ कि.मी हा तिचा सरासरी वेग होता. (विश्रांतीचा वेळ धरून) साधारणपणे २० तास सलग तिचा प्रवास चालू होता.

पहाटे ३.३०-४ च्या सुमारास प्रिती आणि टीम एका शिवमंदिराच्या परिसरात विश्रांतीसाठी थांबले. प्रितीने गाडीतच दिड -दोन तासाची छोटी झोप घेतली आणि पुढील प्रवासासाठी सज्ज झाली.

उत्तुंग आहे तिचे मनोबल,

आणि चालकदल आहे तत्पर,

अभिमान बनेल भारतीयांचा,

प्रसार करी अवयव दानाचा,

पुण्यनगरीचे नाव उंचावणार,

‘रिबर्थ’चा शिलेदार!

शब्दांकन – कविता पिपाडा

X