THE COMEBACK IS ALWAYS STRONGER THAN THE SETBACK (Marathi)

कोमल तरी कणखर। हिंमत न हारेल क्षणभर॥

एकूण प्रवास –  २०० -२५० कि. मी. 

सायकलवरील एकूण वेळ – जवळ जवळ १८-१९  तास 

आतापर्यंतचा एकूण प्रवास –  जवळ जवळ २००० कि.मी.

रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – सिवनी, नागपूर 

आतापर्यंत पार केलेली राज्ये – जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग 

आली रे आली महाराष्ट्राची कन्या नागपुरात पोहोचली! 

औषधे आणि विश्रांती घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रितीच्या वेदना बऱ्याच कमी झाल्या होत्या. सबंध रस्ता हा राष्ट्रीय महामार्गच असल्याने सुस्थितीत आहे.  आता वाढलेलं तापमान हि एक मोठी समस्या निर्माण झाली होती. या उष्णतेमुळे तोंड आल्याने खायलाही थोडा त्रास जाणवत आहे. या व्यतिरिक्त गुडघेदुखी आणि उष्णतेच्या त्रासामुळे तिचा वेग मंदावला आहे आणि ती निर्धारित अंतरापेक्षा जवळजवळ  २००- २५० किमी मागे राहिली आहे आणि हि कसर भरुन काढण्यासाठी तिला रोज नियोजित अंतरापेक्षा थोडे जास्त अंतर कापावे लागेल. 

प्रितीच्या आहारतज्ञांना विचारुन तिच्या आहारात काही बदल करण्यात आले. 

या सायकल मोहिमेत ती रोज ८-१० हजार उष्मांक खर्च करत आहे आणि २-३ हजार इतकेच उष्मांक (calories) ती घेत होती. 

टिमने आता तिच्या आहारात काही उपयुक्त कर्बोदके (carbohydrates) देण्यास सुरुवात केली आहे. तिला उकडलेले बटाटे, भाजलेली रताळी वेळोवेळी देण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त फळे, फळांचा रस सुरु करण्यात आले आहे. नारळपाणी व ताक यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून वारंवार तिला थोडे थोडे खाण्यास दिले जात आहे. 

या दरम्यान टिमचा प्रयत्न आहे की तिने जास्तीत जस्त प्रवास ऊन कमी असतांना संध्याकाळी- रात्री करावा आणि दिवसा थोडी विश्रांती घ्यावी. तिचाही शरीराची घड्याळ (body clock) त्याप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न चालू आहे. 

रस्त्यात सायकलस्वरांचा ग्रुप ज्यात मुंबईच्या काही महिला सायकलपटू ही आहेत .जे काश्मीर ते कन्याकुमारी हि सायकल फेरी करत आहेत त्यांची भेट झाली. ते रोज १००-१५० कि. मी. अंतर कापत आहेत. प्रिती अवयव दानाच्या प्रचार प्रसारासाठी रोज ३००-३५० कि. मी. सायकल चालवत आहे हे पाहून ते खूपच प्रभावीत झाले आणि त्यांनी प्रितीला, तिच्या मोहिमेला यशस्वी होण्यासाठी भरघोस शुभेच्छा दिल्या. 

रात्री उशिरा २ वाजेच्या सुमाराला प्रिती नागपुरात पोहोचली. पहाटे तीन ते सकाळी सात वाजेपर्यंत तिने चांगली झोप घेतली आणि ती पुढे जाण्यास सज्ज झाली आहे. 

Arise, awake and stop not until the goal is reached!

अर्थात, 

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।

हा मंत्र प्रितीने धारण केला आहे. तिच्या या दुष्कर मोहिमेच्या यशासाठी तिला आभाळभर शुभेच्छा.

शब्दांकन – कविता पिपाडा

X