This bike is powered by Priti’s dedication to the cause of ORGAN DONATION!
हि कहाणी आहे प्रितीच्या निर्धाराची,
हाती घेतलेली मोहीम तडीस नेण्याची,
अवयव दानाचा प्रचाराची,
माणुसकी जपण्याची!
प्रितीची कहाणी प्रितीच्या शब्दात!
दहाव्या व अकराव्या दिवसाच्या दुपारपर्यंतचा प्रवास – जवळ जवळ ३५० कि.मी.
सायकलवरील एकूण वेळ – ३० तास
एकूण अंतर – ३००० कि.मी हून जास्त
रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – वेलदूरथी, पिपल्ली, पेन्नानदीचा पूल, अनंतपूर, पेणूकोंडा, पालवसमुद्रम, कोडीकोंडा, बागेपल्ली, चिकबुल्लापूर
आतापर्यंत पार केलेली राज्ये – जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग
प्रितीच्या मोहिमेचा शेवटचा टप्पा प्रितीच्या तोंडून ऐकणे हा एक थरारक आणि अद्भुत अनुभव होता.
मोहिमेचा दहावा दिवस हा प्रितीसाठी अतिशय आव्हानात्मक ठरला . प्रितीने आणि टिम ने ठरवले की, आता न थांबता ( non- stop) जायचे.रस्त्यात सारखेच चढ उतार असल्याने वेग हा कमी जास्त होत होता. टिम आणि प्रिती दोघांना थोडा थकवा जाणवत होता पण त्यांची झोपायला थांबण्याची तयारी नव्हती.
एका सपोर्ट गाडीला एका वाहनाने कट मारला आणि अपघात होता होता वाचला.
रस्त्यात उतार लागला आणि तरीही प्रिती गियर बदलत नाहीये हे टीमच्या लक्षात आले आणि त्यांनी तिला ३-४ वेळा सुचना दिली. तरीही प्रितीवर त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे दिसले आणि त्यांनी तिला थांबवले. शारीरिक आणि मानसिक थकव्याचा परीणाम समजून त्यांनी प्रीतिला ३-४ कि. मि. पायी चालायला लावले.
प्रितीच्या मागे असणाऱ्या गाडीच्या चालकाला थकवा आणि झोप अनावर होत होती त्यामूळे सगळ्या टिमने मिळून ठरवले की, आता कोणतीही अप्रिय घटना घडण्यापेक्षा किंवा कोणालाही त्रास होण्यापेक्षा विश्रांती घेणे हेच उत्तम. या मोहिमेतला आतापर्यंतच्या सर्वात कमी प्रवास हा दहाव्या दिवशी झाला. वेळ वाचवण्याच्या नादात जास्त वेळ जाण्यापेक्षा थांबणे हेच योग्य जाणून त्यांनी थांबण्याचे ठरवले. प्रितीला या सगळ्या गोष्टी काही संकेत देत आहेत असे वाटले. कर्ता करविता ‘तो’च आहे आणि आपण फक्त एक माध्यम आहोत असे प्रिती मानते. सायकल चालवणे तिच्यासाठी एक प्रकारचे ध्यानच आहे. आता प्रवास हा फक्त आनंद घेण्यासाठी करायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवयव दानाची संकल्पना पोहोचवायची असे ठरले. ३-४ तास आराम केला, झोप काढली आणि पुढे जाण्यास सज्ज झाली.
मोहिमेचा शेवट जवळ आल्याने आणि पुढील रस्ता थोडा सोपा असल्याने काही सदस्य संध्याकाळी उशिरा परतीच्या प्रवासाला पुण्याकडे निघाले. रात्रभर प्रवास करुन अर्धा रस्ता तरी जायचं असे ठरवले. ते ४०-५० कि. मी. गेले अन् त्यांच्या गाडीला अपघात होता होता वाचला. त्यांनी रात्री मुक्काम केला आणि सकाळी निघाले.
प्रिती म्हणाली की, मला आक्रमकरीत्या कमी वेळात प्रवास पूर्ण करायचा होता म्हणून मी त्या मानसिकतेत चालत होते, पण आता मला असे वाटते की, जेव्हा मी घाई न करता शांतपणे चालली आहे, मला परमानंदाचा अनुभव येत आहे आणि मनाला खूप शांती आणि समाधान लाभत आहे.
जेव्हा तिला अपूरी झोप आणि सततचा प्रवास याबद्दल विचारले,तेव्हा ती म्हणाली, की मनापासून करायचे काम असले की तहान भूक हरवते, झोप येत नाही. मला माझे ध्येय सतत दिसत राहते. टिम वेळोवेळी कधी आग्रह तर कधी जबरदस्तीने खायला लावते. प्रवासात जेव्हा जेव्हा कोणी भेटले, कुठे थांबले तेव्हा तेव्हा संपूर्ण टीम आणि प्रिती त्यांना अवयव दानाविषयी जागरुक करत होते. त्यांच्या मनात इतर विषयाचे विचार ही येत नव्हते. आणि हेच आपले उद्देश्य .हीच गोष्ट तिला उर्जा देणारी ठरली.
तिच्यासाठी या मोहिमेतला अविस्मरणीय क्ष्ण म्हणजे तिच्याबरोबर काश्मीर – कन्याकुमारी मोहीम २०१९ मध्ये असणारा बेंगलोरचा एक युवक थंगम तिला आज शोधत शोधत आवर्जून भेटायला आला जेव्हा त्याला या मोहिमेबद्दल कळाले. अचानक समोर येऊन ‘पहचना क्या?’ असे विचारले आणि तिला सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला.
भविष्यात तिला अशी मोहीम करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करायला आणि अशा मोहिमा आखायला आवडेल. ती म्हणते की, ‘यश हे महत्वाचे आहे; पण त्याहीपेक्षा येणाऱ्या अडचणी अडथळे जे शिकवतात ते महत्वाचे आहे, ते मी मोकळेपणाने सांगेन.’ अडथळ्याबद्दल बोलले जात नाही आणि यशानंतर त्याचा पूर्ण विसर पडतो मी ह्याची नक्की काळजी घेईन आणि माझ्या अनुभवाचा फायदा होऊ शकेल.
ती म्हणते, ‘वैयक्तिक विक्रमापेक्षा एखादे चांगले काम आपल्याकडून होत आहे ही भावना अतीव समाधानकारक आहे. आणि आपल्या लक्ष्याच्या इतक्या जवळ आल्यावर उत्साह आणि आनंद यापेक्षा एक पूर्ण अनुभवाची अनुभूती मला वाटत आहे’
एका ध्येयवेडीला आणि काय हवे?
शब्दांकन – कविता पिपाडा