This two tyred (lady) doesn’t get too tired
“ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस की रात्र फरक नसतो.”
सलग चोवीस तास सायकलवर स्वार
केले ४०० कि.मी. अंतर पार
एकूण प्रवास – ४०० कि.मी.
सायकलवरील एकूण वेळ – जवळ जवळ २४ तास
रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – जलंधर, लुधियाना, अंबाला, पानिपत, कर्नाल टोल प्लाझा
सकाळी पावणे सातच्या सुमारास मोहिमेचा दुसरा दिवस सुरु झाला. बर्फ नाही, पाऊस नाही, थंडीहि बरीच कमी झाली आणि रस्त्याचा चढहि कमी झाला. आल्हाददायक वातावरण, सरळसरळ आणि गुळगुळीत रस्ता असल्याने प्रितीसाठी दुसरा दिवस तुलनेने चांगला चालला होता आणि दुसऱ्या दिवसाअखेरीस पानिपतला पोहोचूनच विश्रांती घ्यायाची ठरले होते.
अशा सगळ्या जमेच्या बाजू असतांना सायकलीत तांत्रिक बिघाड झाला आणि प्रितीसाठी नवीन अडचण उभी राहिली. टिमचे प्रयत्न चालूच होते पण काही विशेष फरक पडला नाही.
याच वेळी रस्त्यावर चुकीच्या बाजूने येणारी रहदारी, मोठ्या गाड्या आणि सुरळीतपणे न चालवता येणारी सायकल यामुळे वेग कमी झाला होता आणि थोडा वेळ वाया गेला.
दिवस सरला, रात्र झाली तरीही प्रितीची इच्छाशक्ती काही मंदावली नाही.
टिमचे वाहनचालक संदिप थोडे थकले आणि त्यांना झोप येऊ लागली. मग गाडी चालवण्याची जवाबदारी श्री आनंद यांनी घेतली तासभराने त्यांना हि झोपेची आवश्यकता वाटू लागली तेव्हा त्यांना प्रितीने सांगितलेली एक युक्ती आठवली आणि त्यांनी कोरी कॉफ़ी पाउडर खाल्ली. प्रितीला अगोदर केलेल्या मोहिमेत झोप लागून, संतुलन बिघडून पडण्याचा अनुभव होता आणि तिने हा कॉफीचा प्रयोग केल्याचे आनंद यांना सांगितलेले होते.
काही क्षणातच आनंद यांची झोप उडाली आणि ते रात्रभर प्रितीच्या मागे मागे गाडी चालवत होते. थोड्या वेळाने पहाट झाली आणि प्रितीला खूप भूक लागली होती.
दिवस उजडता उजडता ते कर्नाल टोल प्लाझाच्या जवळ पोहोचले होते असे टिमच्या लक्षात आले आणि त्यांनी टोल प्लाझाशी संपर्क साधला. प्रितीलाहि अजुन थोडेच अंतर आहे असे सांगून या टोल पर्यंत ताणले.
टोल प्लाझा NHAI ( national highway authority of India)च्या मालकीचा असून खाजगी कंपनी चालवते. येथील कर्मचारी आणि व्यवस्थापक दोघांनी प्रिती आणि टीमची विशेष काळजी घेतली. त्यांना विश्रांती घेण्यासाठी जागा दिली, खाण्याचे काही जिन्नसहि आणून दिले. या प्लाझावरील लोकांनी प्रिती आणि टीमला ऑफिसपर्यंत आणण्यासाठी जाण्यापासून इतर सर्वतोपरी मदत केली. या बदल्यात त्यांची काही अपेक्षाहि नव्हती आणि स्वतःचे नाव सार्वजनिक न करण्याची विनंती केली.
अवयवदानाच्या चांगल्या कामासाठी आपलाही थोडा हातभार लागावा असा त्यांचा उदात्त हेतू असावा. सकाळचे आठ वाजले आहेत आणि या छोट्या विश्रांतीनंतर प्रितीचा प्रवास चालू झाला आहे. दुपारपर्यंत दिल्लीला पोहोचण्याचा टिमचा निर्धार आहे.
शब्दांकन – कविता पिपाडा