Today’s Menu – Dust and Dirt – Marathi
आजचा मेन्यू – धूळ, माती
एकूण प्रवास – १३९ किमी
रस्त्यावरील महत्वाची ठिकाणे – रॅक्सल बॉर्डर, रामगधवा, सोगोली
प्रिती काठमांडूहून सकाळी ५ वाजता निघाली आणि रस्ता अपेक्षेहून जास्त खराब होता. जो रस्ता शॉर्टकट म्हणून नेपाळ मधल्या मुलीनी सांगितला आणि तोच रस्ता घेण्यास आग्रह करत होती त्या रस्त्याचे एकंदरीत रंगरूप पाहून प्रिती वैतागली. तिला अनोळखी मुलीचा सल्ला ऐकण्याचा पश्चाताप होत होता. रस्ता डोंगर पोखरून तयार केला असल्याने अत्यंत निमुळता चढ होता आणि उतार ही तितकाच निमुळता होता. प्रिती म्हणते किमान ७० अंश निमुळता असेल. अवघे ४७ किमी अंतर चालवण्यासाठी प्रितीला दुपारचे १२ वाजले.
आख्खा रस्ता धूळ, माती, निमुळते चढ उतार यांनीच भरला होता. पुढे देवरालीचा अवघडच होता. अवघा ९ किमीचा घाट पण त्याने प्रितीला नको नको करुन सोडले. अगदी भिती वाटेल इतका उतार होता. पायी चालणे अवघड आणि सायकल चालवणे सुद्धा अवघड.
कसबसा घाट पार केला आणि महामार्गाला लागली. नेपाळच्या सीमेजवळ काहीसायकलिस्टना प्रितीच्या मोहीमेची माहिती मिळाली आणि त्यांनी प्रितीला बोलावले होते पण त्याच दिवशी कसे ही करुन नेपाळ सीमा पार करण्याचा प्रितीचा मानस होता त्यामुळे त्यांच्या आग्रहानंतर सुद्धा प्रिती तेथे गेली नाही.
रस्त्यात तिला मल्लू नावाचा एक केरळी तरुण ब्लॉगर भेटला. जो भारतभर १ वर्ष सायकलवर फिरुन आता नेपाळला चालला होता. त्याचे स्वतःचे यूट्यूब वर चॅनेल आहे. आता तो नेपाळ, भूतान, बांग्लादेश फिरणार आहे. एकटा जीव सदाशिव असल्याने अजूनतरी त्याचा हा प्रवास थांबवण्याचा विचार नाही. अगदी कुकर पासून, मोजकी भांडी, झोपायला टेंट असा संसार घेऊन फिरत आहे. प्रितीला फक्त एक सॅडल बॅग घेऊन अशा मोहिमेवर फिरतांना पाहून तो खूप आश्चर्यचकीत झाला. जेव्हा त्याला रिबर्थ आणि प्रितीच्या अवयव दानप्रसाराबद्दल माहीत झाले तेव्हा त्याला देखील खूप कौतुक वाटले.
संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास प्रिती सिमेजवळ पोहोचली. तिथल्या पोलिस चौकीत सही शिक्का घेतला. नेपाळचे चलन बदलून घेतले. पुढचा रस्ता महामार्गच आहे. तेथे हिमालयन एमटीबी रायडर्स यांनी तिची सदिच्छा भेट घेतली, तिच्या अवयव दानाच्या कार्याबद्दल जाणून घेतले. तिची सायकल पूर्णपणे चेक केली त्यांना तिच्या ध्येयाबद्दल माहीत पडल्यावर खूप आदर वाटला. तिचा यथोचित सत्कार करुन तिला जेवण्यासाठी नेले आणि निरोप दिला.
पुढच्या ठिकाणी तिला मुक्कामाची सोय शोधता शोधता एक तास गेला. आता नवा दिवस काय नवीन आव्हान घेऊन येईल याचा विचार न करता माझे पुढचे लक्ष्य काय आणि ते मी कसे साध्य करणार याकडे तिचे लक्ष्य आहे.
शब्दांकन – कविता पिपाडा.