खडतर वाट पण कणखर मी !

एकूण प्रवास – जवळ जवळ ६० किमी

सायकलवरील अंदाजे वेळ – ७ तास अंदाजे

रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे –  पशुपती नाथ मंदिर, पाटण बाजार

प्रितीचा प्रवास काठमांडूच्या दिशेने सुरु झाला आणि लवकरच ती या नेपाळच्या राजधानीत पोहोचली. सगळ्यात प्रथम तिने प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराला भेट दिली. तिथे ती दोन तास होती.

दर्शन घेऊन स्थानिक बाजारपेठा पाहिल्या. तिथे तिला एक सायकलिस्ट मुलगी भेटली आणि तिने पुढे कोणता रस्ता घ्यावा याबद्दल सांगितले.

प्रितीने नंतर पाटण दरबार येथे पोहचली. तिथे रथयात्रा चालली होती. ती थोडा वेळ तेथे थांबली. तिला पाहून काही लहान मुले तिच्या भोवती जमली, काही कुत्र्याची पिल्लेही होती. प्रितीने सगळ्यांना खाऊ दिला. काही लहान मुलांना तिच्याबद्दल कुतुहल वाटत होते आणि त्यांनी तिला बरेच प्रश्न विचारले तुम्ही कुठून आलात, कुठे चाललात, सायकलवर का जात आहात? प्रितीने तिच्या बद्दल माहितीव सांगतांना त्यांना समजण्यासाठी मुंबईजवळून आले असे सांगितले. त्या मुलांना टीव्ही वर कार्टून पाहून मुंबई बद्दल माहीत होते. प्रितीने बरोबर चालायचा आग्रह केल्यावर ती मुले म्हणाली आम्ही आमचा देश सोडून कोठेही जाणार नाही.

थोड्या वेळाने प्रिती काठमाडूंहून निघाली रस्त्यात तिला एक मोठा  पर्वत दिसत होता आणि तो पार करुन तिला पलिकडे जायचे होते. सुरवातीला चांगला दिसणारा रस्ता नंतर इतका खराब होत गेला की त्याला रस्ता म्हणता येणार नाही. प्रिती तर म्हणते तो रस्ता नव्हताच, आपण कुठून कुठे चाललो आहोत हे देखील कळत नव्हते. आपण कुठे चुकलो तर नाही ना असे सारखे वाटत होते.

सगळीकडे सामसूम, गाड्या नाहीत, कसलाही आवाज नाही, साधे चिटपाखरूही दिसत नव्हते. प्रितीला लांबून जनावरांचे आवाज येत होते. कधी नव्हे ती प्रितीची पाचावर धारण बसली, तिला थोडी भिती हि वाटायला लागली. पहिल्यांदा तिला आपले हे धाडस वेडे धाडस आहे असे वाटायला लागले.

रस्त्यावर लाइट ही नाही, पुढचा रस्ता (?) नीट दिसत नव्हता. प्रितीला खूप आश्चर्य वाटले की असा रस्ता तिला भेटलेल्या मुलीनी सांगितला. तिला कळाले की दुसऱ्या रस्त्यावरही नारायण घाटात लुंबिनी येथे खोदकाम चालू आहे आणि तिथे जाणे इतकेच अवघड आहे. पायी चालता येणार नाही इतका जास्त चढ आणि निमुळता उतार होता.

नेपालमधील स्थानिक लोकांना अशा दुर्गम भागात राहण्याची सवय आहे आणि पर्वतांमध्ये रहात असल्याने तिथे सायकल चालवण्याचा अनुभव देखील आहे. प्रिती जी सायकल चालवत आहे ती हायब्रीड असून तिच्या गिअरचे प्रमाण ३/१५ आहे या उलट नेपालमधील सायकली एमटीबी एमटीबी असून गिअरचे प्रमाण २/१२ आहे. त्यांचा वेग जरी कमी असला तरी त्या पर्वतांमध्ये चालवण्यास जास्त योग्य आणि उपयुक्त आहेत.

दिवसभरात एखादे बऱ्यापैकी हॉटेल हि दिसले नाही. जेवण्यासाठी एखादी जागा दिसली नाही की थांबण्याची हिंमत झाली नाही. कसेही करुन लवकरात लवकर वस्तीच्या ठिकाणी पोहोचणे हाच विचार तिच्या मनात होता. इतका अवघड, वेडावाकडा आणि निर्जन रस्ता तिने आजवर अनुभवला नव्हता.संध्याकाळी खूप शोधल्यानंतर तिला एका कुटुंबात राहण्याची सोय (Home stay) झाली. तिथे फोनला रेंज नसल्याने आवश्यक फ़ोन करण्यासाठी बाहेर यावे लागत होते तरीही फ़ोन कधी कधी लागत नव्हता. तब्बल तीन तास उभ्याने फोनवर बोलून ती थकली होती. तिला जेवण्याची इच्छा हि नव्हती. तिने ठरवले की आता कपडे वगैरे न धुता, सरळ झोपायला जावे.

पुढचा अर्धा दिवस हि खराब रस्त्यावरून सायकल चालवण्यात जाणार आहे. आता प्रितीकडे दोन पर्याय होते एकतर ५५ किमी खराब रस्त्यावरूनपुढे जाणे किंवा ३५ किमी मागे जाऊन दुसरा रस्ता घेणे.  पुढच्या रस्त्यात १० किमी लांब एक अवघड घाट आहे पण मागे जाण्यात जास्त वेळ जाईल म्हणून तिने पुढे जायचे ठरवले आहे.

Courage is not absence of fear,

It is going ahead in spite of fear!

शब्दांकन – कविता पिपाडा

X