Two wheels that moves the SOUL!

आयुष्य बदलवणारी दोन चाके!!

राजधानी दिल्ली काबीज
आता मोहोरा ढोलपूरकडे!!

तिसऱ्या दिवशी ३८३ नॉट आउट!
इनिंग घोषित नाही (फलंदाजी चालू आहे)

आजपर्यंत चा एकूण प्रवास – १२०० कि.मी.
आजचा प्रवास –
३८३ कि. मी.
सायकलवरील आजचा वेळ –
जवळ जवळ २४ तास

रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – मूरथल टोल प्लाझा, दिल्ली,मथुरा, आग्रा
पार केलीली राज्ये –
जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थानचा काही भाग

कर्नाल टोल प्लाझावरून प्रवास चालू झाला तेव्हा सकाळचे सहा वाजत आले होते. साधारण ६० कि. मी. वर मूरथल टोल प्लाझा आहे. प्रिती आणि टिमने काही वेळ तिथले प्रमुख श्री कुमार विवेक विमल, श्री बलवंत सिंह आणि टोल वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर घालवला.

हे लोक टोल गोळा करण्याखेरीज येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितते साठी कटिबद्ध असतात. छोटे मोठे अपघात आणि दुर्घटना त्यांच्यासाठी नेहमीच्या आहेत. त्यांना टिम सदस्य आनंद यांनी मोहिमेच्या उद्देशबद्दल माहिती दिली. मृत व्यक्तीचे डोळे दान करू शकतो पण मेंदू मृत व्यक्तींचे (जे जास्त करुन अपघातामुळे होतात) ७-८ अवयव रुग्णांना उपयोगी येतात आणि कित्येक लोकांचे प्राण वाचू शकतात. भारतात रुग्ण आणि उपलब्ध होणारे अवयव यांचे प्रमाण १०००० : १ इतके व्यस्त आहे. अवयव दान हे जीवनदान हे प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रितीने केलेले हे धाडस बघून सगळयांनी संकल्प केला की , ते ही माहिती शक्य तिथे पोहोचवतील आणि या महान कामात आपला खारीचा वाटा उचलतील.

रस्ता चांगला होता, थंडी नव्हती पण सायकल प्रितीच्या मनासारखे सहकार्य करत नव्हती. दिल्लीला सायकलची थोडी दुरुस्ती झाली. रहदारी आणि चुकीच्या बाजूने येणारी वाहने या दोन गोष्टींची काळजी घ्यायला लागत होती.


दिल्लीत या मोहिमेचे प्रायोजक असणाऱ्या एएनजी ग्रुप चे दिल्लीचे सदस्य प्रितीला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

टिममध्ये आज थोडा बदल करण्यात आला. चालक संदिप, कर्नल दत्ता, ऋतुजा म्हस्के या तिघांना दुपारनंतर विश्रांती देण्यात आली आणि टिम मध्ये दोन नवीन सदस्य सामील झाले. त्यांची ओळख करुन घेऊया.

१. किरण पाटिल – हे पुण्याचे गिर्यारोहक आहेत आणि याअगोदर प्रितीच्या ‘ सुवर्ण समचतुष्कोण’ ( Golden Quadrilateral) या सायकल मोहिमेत तिचे सहकारी होते. सह्याद्री भ्रमण मंडळ या संस्थेत त्यांची प्रितीशी ओळख झाली होती. या मोहिमेत त्यांचे प्रमुख काम प्रितीला मानसिक थकवा जाणवू नये यासाठी तिला आधार देणे आणि वेळोवेळी तिच्या आरामची काळजी घेणे हे असेल.

२. विकास भोसले – मूळचे फलटणचे असणारे विकास हे तांत्रिक बाजू सांभाळणारे आहेत. प्रितीच्या मागे गाडी चालवणे, सायकलमध्ये काही बिघाड झाल्यास तो दुरुस्त करणे हि त्यांची जवाबदारी असेल. ते प्रितीच्या गुजरात -अरुणाचल (पूर्व- पश्चिम) मोहिमेत सहभागी होते.

दोघांच्या येण्याने टिमच्या बाकी सदस्यांना थोडा आराम मिळेल, नवा उत्साह येईल आणि त्यांच्या अनुभवाचा मोहिमेत फायदा होईल.

दिल्लीचा प्रवास थोडा मोठा होता. आणि आख्खा दिवस दिल्ली पार करण्यात गेला. संध्याकाळी प्रिती आग्ऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावरील प्रसिद्ध हल्दीराममध्ये खाण्यास थांबली होती. तिला पाहून लोकांच्या माना कुतूहलाने वळत होत्या. तिथून मथुरा २० कि. मी. आणि आग्रा साधारण ८० कि. मी. होते. पण प्रितीचा कुठेही थांबण्याचा इरादा दिसत नव्हता. तिच्या उत्साहात आणि निर्धारात काहीच फरक नव्हता. टिम सदस्यांना फक्त तिच्या झोपेची आणि आरामाची थोडी काळजी वाटत होती.

रात्री प्रितीने दोनवेळा फक्त काही मिनिटेच (२५-३०) विश्रांती घेतली, काही ताणाचे व्यायाम केली व पुनः प्रवासासाठी सज्ज झाली.

सलग दोन दिवसरात्र दोन चाकांवर राहून, अवयव दानाबद्दल जनजागृती घडवून, लोकांचे आयुष्य बदलायला निघालेल्या या विरांगनेला सलाम!

“क्षमतेपेक्षा जास्त धावले की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”

शब्दांकन – कविता पिपाडा

X